आयपीएलच्या (IPL 2024) आगामी मोसमाबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. आयपीएल २०२४ ही स्पर्धा २२ मार्चपासून सुरू होऊ शकते. तर त्याआधी म्हणजेच फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून महिला प्रीमियर लीग (WPL 2024 ) खेळली जाऊ शकते.
एका वर्तमान पत्राच्या वृत्तानुसार, WPL सामने फेब्रुवारीच्या अखेरीपासून ते मार्चच्या मध्यापर्यंत खेळवले जातील. यानंतर २२ मार्चपासून आयपीएल २०२४ सुरू होऊ शकते. महिला प्रीमियर लीगचे सामने केवळ दोन शहरांमध्ये खेळले जाणार आहेत. तर आयपीएलचे सामने १२ शहरांमध्ये रंगणार आहेत.
डब्ल्यूपीएलचे सामने दिल्ली आणि बेंगळुरूमध्ये आयोजित केले जाणार असल्याचे समोर येत आहे. दुसरीकडे, आयपीएलमध्ये सर्व १० संंघ आपापल्या घरच्या मैदानावर म्हणजे १० मैदानांवर सामने खेळतील, याशिवाय, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्जचे सामने त्यांच्या घरच्या मैदानाव्यतिरिक्त इतर दोन मैदानांवरही होतील.
यावेळच्या आयपीएलचे वेळापत्रक लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे या वर्षी मार्च ते मे दरम्यान सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत आयपीएल सामने आणि निवडणुकीदरम्यान सुरक्षा व्यवस्थेत समतोल राहावा आणि कायदा आणि सुव्यवस्थेत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी या सर्व गोष्टी लक्षात घेऊन वेळापत्रक तयार केले जाईल.
२००९ च्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे आयपीएलचे दक्षिण आफ्रिकेत आयोजन करण्यात आले होते. २०१४ मध्येही निवडणुकांमुळे निम्मे सामने यूएईमध्ये खेळवण्यात आले होते.
भारत आणि इंग्लंड यांच्यात २५ जानेवारीपासून ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका ११ मार्चला संपणार आहे. म्हणजेच यानंतर खेळाडूंना सुमारे दीड आठवड्यांचा ब्रेक मिळेल आणि त्यानंतर आयपीएलचा जल्लोष सुरू होईल.