LSG: लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल दुखापत गंभीर असून त्याला चांगल्या उपचारांसाठी लंडनला पाठवण्यात आले आहे. यामुळे तो आयपीएलच्या १७व्या हंगामातील सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. केएल राहुलच्या अनुपस्थितीत निकोलस पूरन संघाचे नेतृत्व करताना दिसण्याची शक्यता आहे. सध्या इंग्लंडविरुद्ध अखेरच्या कसोटी सामन्यात केएल राहुलचे भारतीय संघात पुनरागमन होईल, अशी अपेक्षा केली जात होती. मात्र, तो अजूनही दुखापतीतून सावरला नसल्याने चाहत्यांची निराशा झाली आहे.
केएल राहुलच्या दुखापतीबाबत बीसीसीआयने निवेदन जारी केले. त्यात असे म्हटले आहे की, "केएल राहुलची दुखापत गंभीर आहे. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक केएल राहुलच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे. केएल राहुलच्या दुखापतीबाबत लवकरच सर्व काही स्पष्ट होईल. मात्र, या दुखापतीमुळे केएल राहुल धर्मशाला कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही."
इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत केएल राहुलची भारतीय संघात निवड करण्यात आली होती. या मालिकेतील पहिल्या सामन्यात केएल राहुल संघाचा भाग होता, ज्यात त्याने ८६ धावांची उत्कृष्ट खेळी केली. मात्र, पहिल्या कसोटीनंतर त्याला दुखापत झाली. यामुळे त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यात विश्रांती देण्यात आली. यानंतर तिसऱ्या कसोटी सामन्यातून तो संघात पुनरागमन करेल, अशी अनेकांना अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. रांची येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यातही त्याचा भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला नाही.
केएल राहुलची दुखापत लखनौसाठी मोठा धक्का मानला जात आहे. दुखापतीमुळे केएल राहुल आयपीएलच्या गेल्या हंगामातील काही सामन्यात खेळू शकला नव्हता.मात्र, दुखापतीनंतर राहुलने जोरदार पुनरागमन केले. यंदाच्या विश्वचषकात तो भारतीय संघाचा भाग होता. केएल राहुल लवकरात लवकर बरा व्हावे, अशी प्रार्थना लखनौ संघाचे चाहते करीत आहेत.