भारतात सध्या आयपीएलचा थरार सुरू आहे. सोबत देशात यंदा लोकसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. अशा स्थितीत आयपीएलमधून एक महत्वाची माहिती समोर येत आहे. आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यावर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे.
वास्तविक, १७ एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. हा कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळला जाईल. पण आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) या सामन्याची जागा बदलण्याचा विचार करत आहे.
रामनवमी सणानिमित्त सुरक्षेच्या कारणास्तव राजस्थान रॉयल्सविरुद्धचा हा नियोजित सामना दुसऱ्या मैदानावर खेळला जाऊ शकतो किंवा पुन्हा शेड्यूल केला जाऊ शकतो. संघ, राज्य संघटना आणि प्रसारकांसह सर्व भागधारकांना संभाव्य बदलांबद्दल माहिती देण्यात आली आहे.
BCCI आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) सुरक्षा समस्यांचे निराकरण करण्यासाठी कोलकाता पोलिसांशी चर्चा करत आहेत. अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. संभाव्य वेळापत्रक समायोजित करण्यासाठी चर्चा सुरू आहे. निवडणुंकामुळे बीसीसीआयने दोन टप्प्यात वेळापत्रक जाहीर केले होते.
अशा परिस्थितीनुसार वेळापत्रकात थोडे बदल करावे लागतील. आयपीएलच्या एका अधिकाऱ्याने क्रिकबझला सांगितले की, आम्ही पोलिस प्रशासनाशी चर्चा करत आहोत आणि लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो.
विशेष म्हणजे, कोलकाता नाईट रायडर्स त्यांच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये अपराजित आहे. त्यांचा पुढचा सामना ३ एप्रिल रोजी विशाखापट्टणममध्ये दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. राजस्थान रॉयल्सही आतापर्यंत उत्कृष्ट लयीत आहे.