IPL 2024 GT vs PBKS : पंजाब किंग्सने पारडं फिरवलं, शेवटच्या षटकात गुजरातवर रोमहर्षक विजय
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2024 GT vs PBKS : पंजाब किंग्सने पारडं फिरवलं, शेवटच्या षटकात गुजरातवर रोमहर्षक विजय

IPL 2024 GT vs PBKS : पंजाब किंग्सने पारडं फिरवलं, शेवटच्या षटकात गुजरातवर रोमहर्षक विजय

Apr 05, 2024 12:20 AM IST

IPL 2024 GT Vs PBKS : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२४ मधील १७ व्या सामन्यात पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सचा पराभव केला. शेवटपर्यंत उत्कंठावर्धक झालेल्या या सामन्यात गुजरातचा ३ विकेट्सने पराभव केला.

पंजाबचा गुजरातवर रोमहर्षक विजय
पंजाबचा गुजरातवर रोमहर्षक विजय

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या १७ सीझनमधील १७ व्या सामन्यात पंजाबने गुजरात टायटन्स (GT) ला धूळ चारली. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात पंजाब किंग्सने गुजरातवर तीन विकेट्सने विजय मिळवला. पंजाबने २०० धावांचे आव्हान एक चेंडू शिल्लक असताना व सात गड्यांच्या मोबदल्यात पार केला. शशांक सिंह आणि आशुतोष शर्मा पंजाब किंग्जच्या विजयाचे शिल्पकार ठरले. या दोघांनी गुजरातच्या तोंडातील विजयाचा घास हिरावून घेतला. शशांक सिंहने २९ चेंडूत नाबाद ६१ धावा काढून विजयावर शिक्कामोर्तब केले. तर आशुतोष शर्माने १७ चेंडून ३१ धावांची वेगवान खेळी केली. 

 २०० धावांच्या डोंगराएवढ्या आव्हानाचा सामना करताना पंजाब किंग्सची सुरुवात अडखळत झाली. १३ धावा धावफलकावर लागल्या असतानाच कर्णधार शिखर धवन तंबूत परतला. धवनला उमेश यादवने बाद केले. दुसरा सलामीवीर जॉनी बेयरस्टोने काही आकर्षक फटके मारले, मात्र तो मोठी खेळी करू शकला नाही. नूर अहमदने बेयरस्टो आणि प्रभसिमरन सिंह यांना तंबूचा रस्ता दाखवला. 

त्यानंतर पंजाब किंग्सने सॅम करन, सिकंदर रजा आणि जितेश शर्मा यांच्या विकेट्स स्वस्तात गमावल्या. एकवेळ पंजाब किंग्सची अवस्था ६ बाद १५० झाली होती. विजयाच्या जवळ जाणे त्यांच्यासाठी कठीण वाटत होते. मात्र शशांक सिंह आणि आशुतोष शर्मा यांच्या जोडीने पारडं फिरवलं व गुजरातच्या तोंडचा विजयाचा घास हिरावला. इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात उतरलेल्या आशुतोषने आपल्या खेळीत ३ चौकार व ३ षटकार मारले.

अंतिम षटकात पंजाबला विजयासाठी ७ धावांची गरज होती. दर्शन नालकंडेच्या या षटकातील पहिल्याच चेंडूवर आशुतोष शर्मा बाद झाला. त्यानंतर दर्शनने वाइड बॉल टाकला. त्यानंतर पंजाबला ५ चेंडूत ६ धावांची गरज होती. दुसऱ्या चेंडूवर हरप्रीत बराडला एकही धाव घेता आली नाही. तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेत शशांक सिंह स्ट्राईकवर आला. षटकातील चौथ्या चेंडूवर शशांक सिंहने चौकार मारून विजयाच्या समीप नेले. त्यानंतर लेग बायच्या रुपात एक धाव घेत पंजाबला विजय मिळवून दिला.

कर्णधार शुभमन गिलची तुफानी खेळी -

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या गुजरात टायटन्सने २० षटकात ४ बाद १९९ धावांचा स्कोअर उभारला होता. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने ४८ चेंडूत ८९ धावा बनवल्या, त्यामध्ये ६ चोकार व ६ षटकारांचा समावेश होता. साई सुदर्शनने १९ चेंडूत ३३ धावांचे योगदान दिले. केन विलियमसन (२६) आणि राहुल तेवतिया (नाबाद २३ धावा) यांच्या खेळाच्या बळावर गुजरातने मोठी धावसंख्या उभारली. पंजाब किंग्सकडून कगिसो रबाडाने दोन विकेट घेतल्या.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग