आयपीएल २०२४ चा थरार सुरू झाला आहे. आतापर्यंत ३ सामने झाले आहेत. लोकसभा निवडणुकांमुळे आयपीएलच्या फक्त पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकात ७ एप्रिलपर्यंत होणाऱ्या सामन्यांची माहिती देण्यात आली आहे.
दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. पण त्याआधी आयपीएल २०२४ चा अंतिम सामना कुठे खेळवला जाणार आहे? याबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या १७व्या हंगामाचा अंतिम सामना २६ मे रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाऊ शकतो. बीसीसीआयच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
पीटीआयच्या माहितीनुसार , दुसरी क्वालिफायरदेखील चेन्नईत होणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामन्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने गत विजेत्या संघाच्या होम ग्राउंडवर सलामीचा सामना आणि अंतिम सामना खेळवण्याची परंपरा राखली आहे.
मागील हंगामातील चॅम्पियन संघाच्या होम ग्राउंडवर आयपीएलचा उद्घाटनाचा सामना खेळवण्याची आणि अंतिम सामना आयोजित करण्याची परंपरा आहे. पण कोविडमध्ये हे पाळता आले नव्हते. पण गेल्या मोसमात आयपीएलचा उद्घाटनाचा सामना आणि अंतिम सामना २०२२ मधील चॅम्पियन संघाच्या होम ग्राउंडवर खेळवण्यात आले होते.
सोबतच बीसीसीआयने सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा लक्षात घेऊन उर्वरित आयपीएल सामन्यांचे वेळापत्रक निश्चित केले आहे आणि ते लवकरच जाहीर केले जाईल.
महेंद्रसिंह धोनीचा हा शेवटचा सीझन असू शकतो. अशा परिस्थितीत चेन्नईमध्ये अंतिम सामना होणे सीएसकेच्या चाहत्यांसाठी मोठ्या ट्रीटपेक्षा कमी नाही. कारण चेन्नई सुपर किंग्जने या मोसमात अंतिम फेरी गाठली तर चाहत्यांना शेवटच्या सामन्यात धोनीला होम ग्राउंडवर खेळताना पाहता येईल. चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२४ मध्ये विजयाने सुरुवात केली आहे. संघाने पहिल्या सामन्यात आरसीबीचा ६ गडी राखून पराभव केला आहे.
संबंधित बातम्या