ipl 2024 csk vs rcb 1st match highlights : चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२४ ची धमाकेदार सुरुवात केली आहे. सलामीच्या सामन्यात सीएसकेने आरसीबीचा ६ गडी राखून पराभव केला.
अशाप्रकारे चेपॉकच्या स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जला (CSK) पराभूत करण्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) पुन्हा एकदा अपयशी ठरले. बेंगळुरूने २००८ मध्ये चेन्नईचा त्यांच्या घरच्या मैदानावर पहिल्यांदा आणि शेवटचा पराभव केला होता. तेव्हापासून आरसीबी सातत्याने चेपॉकच्या मैदानावर पराभूत होत आली आहे.
आजच्या सामन्यात आरसीबीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि २० षटकात ६ बाद १७३ धावा केल्या. प्रत्युत्तरात सीएसकेने १८.४ षटकात १७६ धावा करत सामना जिंकला.
तत्पूर्वी, १७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जला कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र यांनी चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ३८ (२४ चेंडू) धावांची भागीदारी केली. संघाला पहिला धक्का चौथ्या षटकात कर्णधार गायकवाडच्या रूपाने बसला, त्याने ३ चौकार मारून १५ धावा (१५ चेंडू) केल्या.
त्यानंतर अजिंक्य रहाणे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. रहाणे आणि रचिन रवींद्र यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी झाली. न्यूझीलंडच्या स्टार खेळाडूने तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने २७ धावा केल्या.
यानंतर रहाणे २७ धावा करून बाद झाला. रहाणेने दोन शानदार षटकार खेचले. त्याचवेळी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या डॅरिल मिशेलने दोन षटकारांच्या मदतीने २२ धावा काढल्या.
यानंतर चेन्नईने एकही विकेट गमावली नाही. रवींद्र जडेजा आणि शिवम दुबे यांनी संघाला विजय मिळवून दिला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ६६* (३७ चेंडू) धावांची भागीदारी केली. यादरम्यान शिवम दुबेने ३८* आणि जडेजाने २५* (१७ चेंडू) धावा केल्या.
या सामन्यात आरसीबीची गोलंदाजी अत्यंत खराब होती. मात्र, ग्रीनने ३ षटकांत २७ धावांत २ बळी घेतले. याशिवाय यश दयाल आणि कर्ण शर्मा यांना १-१ विकेट मिळाली. दयालने ३ षटकांत २८ धावा आणि कर्ण शर्माने २ षटकांत २४ धावा दिल्या.
आरसीबीसाठी अनुज रावतने सर्वाधिक ४८ आणि दिनेश कार्तिकने ३८ धावा केल्या. तर मुस्तफिजुर रहमानने सीएसकेसाठी ४ विकेट मिळवले.
तत्पूर्वी, या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीची सुरुवात चांगली झाली आणि कर्णधार डू प्लेसिससह विराट कोहलीने पहिल्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी केली. डुप्लेसिसने चांगली फलंदाजी करत ३५ धावांच्या खेळीत ८ चौकार लगावले. पण मुस्तफिजुर रहमानने एकाच षटकात डू प्लेसिस आणि रजत पाटीदार (००) यांना बाद केले.
त्यानंतर दीपक चहरने ग्लेन मॅक्सवेलला पॅव्हेलियनमध्ये पाठवले, त्याला खातेही उघडता आले नाही. नंतर मुस्तफिझूरने विराट कोहली २१) आणि कॅमेरून ग्रीन (१८) यांना बाद करून आरसीबीला अडचणीत टाकले. येथून अनुज रावत आणि दिनेश कार्तिक यांनी ९५ धावा जोडून आरसीबीला १७० धावांचा टप्पा गाठून दिला. सीएसकेकडून मुस्तफिजुर रहमानने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या.