India Vs ireland womens Cricket : राजकोट इथं बुधवारी खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघानं आयर्लंडचा ३०४ धावांनी पराभव केला. महिलांच्या एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासात धावांच्या बाबतीत भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी २०१७ मध्ये भारतीय संघानं आयर्लंडचा २४९ धावांनी पराभव केला होता.
स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांच्या पहिल्या शतकांच्या जोरावर भारतीय संघानं आयर्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात पाच गडी गमावून ४३५ धावा केल्या. ही भारताची ५० षटकांच्या फॉर्मेटमधील आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे. प्रत्युत्तरादाखल खेळणाऱ्या आयरिश संघाचा डाव ११० चेंडू शिल्लक असतानाच आटोपला. आयरिश संघाला ३१.४ षटकात केवळ १३१ धावा करता आल्या. वनडेमध्ये सर्वाधिक धावांच्या फरकानं विजय नोंदवण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर आहे. न्यूझीलंडनं पाकिस्तान संघाचा ४०८ धावांनी पराभव केला आहे.
भारतीय संघाकडून कर्णधार स्मृती मंधानं हिनं अवघ्या ८० चेंडूत १३५ धावा कुटल्या. तिचं हे दहावं वनडे शतक आहे. स्मृतीच्या शतकी खेळीत ७ षटकार आणि १२ चौकारांचा समावेश होता. भारतीय महिला संघ प्रथमच ४०० धावांचा टप्पा पार करण्यात यशस्वी ठरला आणि ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसह एलिट यादीत सामील होण्यात यशस्वी झाला. महिलांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही चौथी सर्वोच्च धावसंख्या आहे. या शानदार खेळीच्या जोरावर स्मृतीनं गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ८७ चेंडूत शतक झळकावणाऱ्या हरमनप्रीत कौरला मागे टाकलं.
अनुभवी स्मृती मंधाना एका बाजूनं आयरिश गोलंदाजांना झोडपून काढत असताना दुसऱ्या बाजूनं नवोदित प्रतिका रावलनंही किल्ला लढवला. तिनं आपलं पहिलं आंतरराष्ट्रीय शतक ठोकलं. तिनं १५४ धावा केल्या. द्विशतकाकडे वाटचाल करणाऱ्या प्रतिकाला ४४व्या षटकात फ्रेया सार्जेंटनं डेम्पसीकरवी झेलबाद केलं. प्रतिका रावलने १२९ चेंडूत २० चौकार आणि १ षटकार मारत १५४ धावा केल्या.
भारतीय महिला संघाच्या फलंदाजांनी आयरिश गोलंदाजीची पिसे काढत निर्धारित ५० षटकांत ५ गडी गमावून ४३५ धावा केल्या. महिलांच्या एकदिवसीय सामन्यातील ही आतापर्यंतची चौथी सर्वोच्च धावसंख्या आहे. आयर्लंडकडून ओरला प्रेंडरगास्टनं दोन बळी घेतले. आर्लेन केली, फ्रेया सार्जेंट आणि जॉर्जिना डेम्पसी यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.
संबंधित बातम्या