मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  INDW vs AUSW: तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियानं ३-० नं मालिका जिंकली

INDW vs AUSW: तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियानं ३-० नं मालिका जिंकली

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 02, 2024 10:55 PM IST

India Lost ODI Series Against Australia: ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताला ३-० अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला.

IND vs AUS ODI Series
IND vs AUS ODI Series

INDW vs AUSW 3rd ODI Match Report: ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारताला १९० धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह भारताने ३-० अशा फरकाने मालिका गमावली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारतासमोर विजयासाठी ३३९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ३२.४ षटकात अवघ्या १४८ धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून फोबी लिचफिल्डने शानदार शतक झळकावले, ज्यामुळे तिला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, फोबी लिचफिल्डने १२५ चेंडूत १९९ धावा केल्या. तिने आपल्या खेळीत १६ चौकार आणि एक षटकार मारला. याशिवाय, कर्णधार अ‍ॅलिसा हिलीने ८५ चेंडूत ८२ धावा केल्या. तसेच अॅशले गार्डनर, अॅनाबेल सदरलँड आणि अलाना किंग यांनी महत्त्वाची खेळी केली. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियन संघाने ५० षटकात ७ विकेट गमावून ३३८ धावा केल्या. भारताकडून श्रेयंका पाटीलने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. अमनजोत कौरच्या खात्यात २ विकेट जमा झाल्या. तसेच पूजा वस्त्राकर आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक-एक विकेट मिळवली.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला ३२ धावांवर पहिला धक्का बसला. सलामीवीर यस्तिका भाटिया अवघ्या ६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. स्मृती मानधना २९ धावा करून बाद झाली. भारतीय फलंदाज ठराविक अंतराने आऊट झाले. रिचा घोष आणि कर्णधार हरमनप्रीत कौरही लवकर पॅव्हेलियनमध्ये परतल्या. जेमिमाह रॉड्रिग्जने २५ धावा केल्या. दरम्यान, १०० धावांचा टप्पा गाठण्यापूर्वीच भारताचा निम्मा संघ माघारी परतला. दिप्ती शर्माने एकाकी झुंज दिली. तिने नाबाद २५ धावांचे योगदान दिले. भारताने हा सामना १९० धावांनी गमावला. ऑस्ट्रेलियाकडून जॉर्जिया वेरहॅमने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. याशिवाय, मेगन शुट, अॅलाना किंग आणि अॅनाबेल सदरलँड यांनी प्रत्येकी दोन- दोन विकेट घेतल्या. ऍशले गार्डनरच्या खात्यात एक विकेट जमा झाली.

भारतीय संघ:

यास्तिका भाटिया, स्मृती मानधना, रिचा घोष (विकेटकिपर), जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, मन्नत कश्यप, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंह.

ऑस्टेलियाचा संघ:

फोबी लिचफिल्ड, अॅलिसा हिली (कर्णधार आणि विकेटकिपर), एलिस पेरी, बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, अॅशले गार्डनर, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरेहम, अलाना किंग, किम गर्थ, मेगन शट.

WhatsApp channel

विभाग

For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi