India vs Sri Lanka: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले. या दौऱ्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका आणि तितक्याच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतून भारतीय क्रिकेटमध्ये गौतम गंभीर युगाची सुरुवात होणार आहे. दोन वेळा आयसीसी विश्वचषक विजेता आणि भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरची राहुल द्रविडच्या जागी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.
गंभीरच्या मार्गदर्शनाखालील टीम इंडिया जुलै-ऑगस्ट मध्ये तीन टी-२० आणि तितक्याच एकदिवसीय सामन्यांसाठी श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. श्रीलंका आणि भारत यांच्यात २६ जुलैपासून टी-२० मालिका खेळली जाईल. त्यानंतर द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेला १ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. सर्व टी-२० सामने पल्लेकल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जातील. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील संपूर्ण एकदिवसीय मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे.
पहिला टी-२० सामना: २६ जुलै २०२४
दुसरा टी-२० सामना: २७ जुलै २०२४
तिसरा टी-२० सामना: २९ जुलै २०२४
पहिला एकदिवसीय सामना: ०१ ऑगस्ट २०२४
दुसरा एकदिवसीय सामना: ०४ ऑगस्ट२०२४
तिसरा एकदिवसीय सामना: ०७ ऑगस्ट २०२४
एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह विश्रांती देण्याची शक्यता आहे. भारताचा विकेटकिपर आणि फलंदाज केएल राहुलला भारताच्या कर्णधारपदी नियुक्त केले जाऊ शकते. श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० संघाचे नेतृत्व अष्टपैलू हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आले आहे.
भारताविरुद्धच्या मालिकेतून श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणार आहे. भारताने २०२१ मध्ये द्विपक्षीय मालिकेसाठी शेवटचा श्रीलंका दौरा केला होता. द्रविड हा भारताचा कार्यवाहक मुख्य प्रशिक्षक होता. तर, अनुभवी सलामीवीर शिखर धवन संघाचे नेतृत्व करत होता. भारताने एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली. तर, श्रीलंकेने पाहुण्यांना टी-२० मालिकेत पराभूत केले.
संबंधित बातम्या