IND vs ENG ODI Series : टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. गुरुवारपासून (६ फेब्रुवारी) एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. मात्र या मालिकेपूर्वी भारतीय संघातील एका सदस्याला पोलिसांनी पकडले, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेमकं झालं असं की, टीम इंडियाचा थ्रोडाऊन स्पेशालिस्ट रघू याला पोलिसांनी चुकून पकडले. भारतीय संघाचे खेळाडू बसने जाण्याच्या तयारीत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यादरम्यान रघू भारतीय संघाच्या बसच्या दिशेने जाऊ लागतो, परंतु मधोमध उपस्थित असलेले काही पोलिस रघूला अनोखळी इसम असल्याचे समजून थांबवतात.
पण यानंतर रघू आपण टीम इंडियासोबत असल्याचे आणि संघातील सदस्य असल्याचे पोलिसांना पटवून देतो. यानंतर त्याला सोडून देतात. अशा प्रकारे टीम इंडियाच्या सदस्याला आधी पोलिसांनीचुकून पकडले आणि नंतर सोडून दिले.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाची ही शेवटची वनडे मालिका असेल. या वनडे मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहलीही दिसणार आहेत.
एकदिवसीय मालिकेपूर्वी भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ टी-20 सामन्यांची मालिका खेळली गेली होती. टीम इंडियाने या मालिकेत ४-१ असा विजय मिळवला. टीम इंडियाने टी-20 मालिकेतील पहिला सामना ७ गडी राखून आणि दुसरा सामना २ विकेटने जिंकला होता.
त्यानंतर तिसऱ्या टी-20 मध्ये इंग्लंडने २६ धावांनी विजय मिळवला. यानंतर मेन इन ब्लू संघाने चौथ्या टी-20 मध्ये १५ धावांनी आणि पाचव्या टी 20 मध्ये १५० धावांनी विजय मिळवला.
संबंधित बातम्या