Jasprit Bumrah Injury Update : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी बीसीसीआयने अद्याप टीम इंडियाची घोषणा केलेली नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीचे संघ जाहीर करण्याची आज (१२) शेवटची तारीख आहे. सर्व ८ देशांना आज मध्यरात्री १२ पर्यंत आपापल्या प्राथमिक संघाची यादी आयसीसीला द्यावी लागणार आहे.
मात्र, मीडिया रिपोर्टनुसार, बीसीसीआयने यासाठी आयसीसीकडून आणखी वेळ घेणार आहे. कारण, भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहबाबत एक वाईट बातमी समोर आली आहे.
जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीच्या गट टप्प्यातील सामन्यांमधून बाहेर राहू शकतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या कसोटीदरम्यान या स्टार वेगवान गोलंदाजाला पाठीला दुखापत झाली होती, त्यामुळे तो चालू सामन्यात स्कॅनसाठी गेला होता. बुमराहच्या दुखापतीच्या गंभीरतेबाबत सस्पेंस असला तरी आता समोर आलेल्या काही बातम्यांमुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांची निराशा होणार आहे.
एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराह मार्चच्या पहिल्या आठवड्यात तंदुरुस्त होण्याची अपेक्षा आहे. याचा अर्थ बुमराह मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहील. म्हणजेच तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये लीग स्टेजचे सामने खेळू शकणार नाही.
या वृत्तात म्हटले आहे की "तो (जसप्रीत बुमराह) एनसीएमध्ये जाणार आहे. त्याला फ्रॅक्चर नाही, परंतु त्याच्या पाठीवर सूज आहे. त्यामुळे त्याच्या रिकव्हरीवर एनसीएची नजर राहणार असून तो तीन आठवडे तिथेच राहणार आहे. यानंतर त्याला एक किंवा दोन सराव सामने खेळावे लागतील. जेणेकरून त्याची फिटनेस समजू शकेल.
सिडनी येथे खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या कसोटी सामन्यात बुमराहला दुखापत झाली होती. WTC फायनलच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी भारताला पाचवी कसोटी जिंकायची होती, पण बुमराहला या सामन्यात दुखापत झाल्यामुळे भारतीय संघाने हा कसोटी सामना गमावला. खरे तर बुमराहने गोलंदाजी केली असती तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.
संबंधित बातम्या