कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यात शुक्रवारपासून (२७ सप्टेंबर) कसोटी सामना खेळला जात आहे. मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याचा आज पहिला दिवस असून पहिल्याच दिवशी ग्रीनपार्क स्टेडियममध्ये चांगलाच राडा झाला. हे प्रकरण दोन्ही देशांच्या चाहत्यांमधील आहे, ज्यात परिस्थिती चाहत्यांना रुग्णालयात नेण्यापर्यंत पोहोचली.
क्रिकेट संघांचे चाहते खूप उत्साही असतात. ते त्यांच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी मैदानात उपस्थित राहतात. अशा स्थितीत बांगलादेशचे चाहतेही कसोटी मालिका पाहण्यासाठी भारतात आले आहेत. पण यादरम्यान काही भारतीय चाहत्यांनी बांगलादेशी चाहत्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे.
वाघाचा पोशाख परिधान केलेल्या बांगलादेशी चाहत्याच्या छातीवर बांगलादेशी ध्वज होता. या चाहत्याच्या हातात झेंडाही होता. काही भारतीय चाहत्यांनी या बांगलादेशी चाहत्याच्या हातातून झेंडा हिसकावून घेतला. या बांगलादेशी चाहत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही लोक या बांगलादेशी फॅनजवळ उभे आहेत आणि हा व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत खुर्चीवर बसलेला दिसत आहे. पोलीसही या बांगलादेशी चाहत्याजवळ आहेत. या चाहत्याला आता रुग्णालयात नेण्यात आले आहे.
या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहितने प्लेइंग-११ मध्ये कोणताही बदल केलेला नाही. म्हणजे कुलदीप किंवा अक्षर या दोघांनाही संधी मिळाली नाही. जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज या तीन वेगवान गोलंदाजांसह भारतीय संघ मैदानात उतरला आहे. तर अश्विन आणि जडेजा फिरकीपटूंची जबाबदारी सांभाळतील.
तर बांगलादेशचा कर्णधार नजमुलने प्लेइंग-११ मध्ये दोन बदल केले आहेत. वेगवान गोलंदाज तस्किन अहमद आणि नाहिद राणा यांच्या जागी तैजुल इस्लाम आणि खालिद अहमद यांना प्लेइंग-११ मध्ये स्थान मिळाले आहे
बांगलादेश : शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालिद अहमद.
भारत: यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.