indian fans abusing glenn maxwell wife vini raman : क्रिकेट वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला. या पराभवासह कोट्यवधी भारतीयांची स्वप्ने भंगली. तर ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्डकप ट्रॉफीवर आपले नाव कोरले.
दरम्यान आता, या पराभवानंतर भारताच्या क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियन फलंदाज ग्लेन मॅक्सवेलची पत्नी विनी रमन हिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाजाच्या पत्नीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले दु:ख व्यक्त केले आहे.
मॅक्सवेलची पत्नी विनी रमन मूळची भारतीय आहे, पण तिचा जन्म ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे झाला आणि ती ऑस्ट्रेलियात वाढली. ऑस्ट्रेलियाच्या भारताविरुद्धच्या विजयानंतर विनी रमनने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती द्वेषयुक्त मेसेजबद्दल बोलत आहे.
आपल्या वेदना शेअर करताना विनी रमणने लिहिले, “सर्व द्वेषपूर्ण शिवगाळ करणाऱ्या लोकांना एक संदेश. नीट राहा...”
“मला हे सांगावे लागतेय यावर माझा विश्वास बसत नाही. तुम्ही ज्या देशात जन्मला आणि ज्या देशाकडून तुमचा पती आणि तुमच्या मुलांचा बाप खेळत आहे. त्या देशाला सपोर्ट करणे हे चुकीचे आहे का? शांत राहा आणि तुमचा राग जगातील महत्वाच्या समस्यांकडे वळवा."
मॅक्सवेल आणि विनी रमन यांनी जवळपास ५ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर मार्च २०२२ मध्ये लग्न केले होते. विनी भारतातील तामिळ कुटुंबातील आहे. अशा परिस्थितीत मॅक्सवेल आणि विनी यांनी आधी ख्रिश्चन आणि नंतर तमिळ रितीरिवाजानुसार लग्न केले.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत सर्वबाद २४० धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने ४३ षटकांत ४ गडी गमावून लक्ष्य गाठले. मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियासाठी विजयी शॉट मारला.