मेलबर्न कसोटीत टीम इंडियाचा १८४ धावांनी पराभव झाला. यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. सोबतच या दोघांनी आता निवृत्त व्हावे, अशी मागणी सर्व बाजूने होत आहेत.
अशातच आता भारताचा माजी यष्टीरक्षक-फलंदाज सुरिंदर खन्ना याने फॉर्मात नसलेले वरिष्ठ फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्मा पर्थमधील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेतील पहिल्या कसोटीला खेळू शकला नाही, परंतु संघात सामील झाल्यानंतर या दौऱ्यावर धावा काढण्यासाठी तो संघर्ष करत आहे. तीन कसोटी सामन्यांच्या ५ डावात त्याने केवळ ३१ धावा केल्या आहेत.
इतकेच नाही तर भारतीय कर्णधाराने आपली फलंदाजीचा क्रमही बदलून बघितला. पण त्याच्या फलंदाजीत काहीच फरक पडला नाही.
दुसरीकडे कोहलीही सातत्याने फ्लॉप होत आहे. या दौऱ्यातील शेवटच्या तीन कसोटीत त्याने ७, ११, ३, ३६ आणि ५ धावा केल्या आहेत. तो सातत्याने एका पद्धतीने बाद होत आहे, हा चिंतेचा विषय ठरला आहे. बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या डावात चांगले टेक्निक दाखवूनही कोहलीला मोठी धावसंख्या करण्यात अपयश आले आणि त्यानंतर दुसऱ्या डावातही त्याने तीच चूक केली.
सुरिंदर खन्ना पुढे म्हणाला, 'रोहित शर्मा आणि विराट कोहली पूर्ण फॉर्ममध्ये नाहीत. जेव्हा तुमचे मुख्य फलंदाज फॉर्ममध्ये नसतात आणि तुमच्याकडे पुरेशा धावा नसतात तेव्हा कसोटी सामना जिंकणे कठीण असते. ऑस्ट्रेलियाने परिस्थितीनुसार चांगले क्रिकेट खेळले आणि चांगले संयोजन केले. आपले युवा खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत, नितीश कुमार रेड्डी याने पहिल्याच दौऱ्यात शतक केले आणि जयस्वाल चांगला खेळत आहेत.
माजी क्रिकेटपटू खन्ना पुढे म्हणाला, 'रोहित परत आल्यापासून तो मधल्या फळीत आणि टॉप ऑर्डरमध्ये खेळत आहे, पण धावा काढू शकत नाही. ही एक समस्या आहे ज्याकडे गौतम गंभीर, निवडकर्ते लक्ष देत नाहीत. आता रोहित आणि विराट यांना कडक शब्दात सांगण्याची गरज आहे. याची हिंम्मत मॅनेजमेंटने दाखवण्याची गरज आहे. तुमच्या वरिष्ठ क्रिकेटपटूंनी धावा केल्या पाहिजेत अशी तुमची अपेक्षा आहे, पण ते पूर्ण फॉर्ममध्ये नाहीत. चांगले परिणाम मिळविण्यासाठी तुम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील."
संबंधित बातम्या