भारतीय क्रिकेटसाठी २०२४ हे वर्ष चढ उताराचे राहिले. या वर्षात भारताने टी-20 वर्ल्डकप जिंकला. पण कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाची कामगिरी अतिशय वाईट राहिली. पण या वर्षात टीम इंडियाला भविष्यात सुपस्टार बनण्याची क्षमता आहे, असे तीन खेळाडू मिळाले. या तिन्ही खेळाडूंनी वेगवेगळ्या कसोटी मालिकांमधून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.
विशेष म्हणजे, या खेळाडूंच्या करिअरमध्ये त्यांच्या वडिलांचे खूप मोठे योगदान आहे. वडिलांच्या त्यागामुळे आणि जिद्दीमुळेच ते या स्तरावर पोहोचले आहेत.
नितीश रेड्डी १२ वर्षांचे असताना त्याच्या वडिलांनी त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकारी नोकरीतून व्हीआरएल घेतली जेणेकरून त्याच्या मुलाच्या कोचिंगमध्ये कोणतीही अडचण येऊ नये. नितीशचे वडील मुत्यालू रेड्डी यांनी २० लाख रुपये गुंतवून व्यवसाय सुरू केला, मात्र नुकसान सहन करावे लागले. त्यावेळी रेड्डी कुटुंबाकडे नितीशची बॅट विकत घेण्यासाठीही पैसे नव्हते.
पण मेलबर्न कसोटीत नितीशने रेड्डीने शतक झळकावले तेव्हा स्टेडियममध्ये उपस्थित असलेले वडील मुत्यालू रेड्डी स्वतःचे अश्रू रोखू शकले नाहीत.
ध्रुव जुरेलने रांची कसोटीत इंग्लंडविरुद्ध पदार्पण केले आणि त्याने या कसोटीत अर्धशतक केले. अर्धशतकानंतर ध्रुवने त्याच्या वडिलांना कडक सॅल्युट ठोकून त्यांच्या कष्टाचा आणि त्यागाचा सन्मान केला होता. ध्रुव जुरेलच्या वडील नेमसिंग जुरेल यांनी कारगिल युद्धात सहभाग घेतला होता. ध्रुवच्या क्रिकेट करिअरसाठी नेमसिंग जुरेल यांनीही प्रचंड मेहनती घेतली आहे.
ध्रुवच्या वडिलांनी १४व्या वर्षी त्याला नोएडा येथील क्रिकेट आकादमीत घातले. यासाठी त्यांना आग्रा येथील घर सोडावे लागले. विशेष म्हणजे, ध्रुवला पहिली क्रिकेट किट घेऊन देण्यासाठी नेमसिंह जुरेल यांना सोन्याचे दागिने विकावे लागले होते.
१५ फेब्रुवारी २०२४ रोजी सरफराज खान याने कसोटीत पदार्पण केले. यावेळी त्याचे वडील नौशाद खान यांना अश्रू अनावर झाले.
सरफराजला राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पदार्पण कॅप मिळाली. तेव्हा नौशाद हे तिथे उपस्थित होते. २६ वर्षांच्या सरफराजला त्याची डेब्यू कॅप मिळताच तो लगेचच त्याच्या वडिलांकडे धावला आणि त्यांना मिठी मारून त्यांच्या डोक्यावर कॅप घातली. संपूर्ण खान कुटुंबासाठी आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी हा भावनिक क्षण होता. नौशादने खुलासा केला होता की, ते आपल्या मुलाच्या माध्यमातून कसोटी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न जगत आहेत आणि त्यांची मेहनत आणि संयम अखेर फळाला आला. नौशाद यांनी उत्तर प्रदेशातील गाव सोडून मुंबईत संघर्ष केला आणि दोन मुलांना क्रिकेटर बनवले. मुशीर खान हा भारताकडून अंडर १९ वर्ल्डकप खेळला आहे.
संबंधित बातम्या