भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोटमध्ये कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा (१७ फेब्रुवारी) खेळ सुरू झाला आहे. सामन्याचे पहिले दोन दिवस फलंदाजांच्या नावावर राहिले. भारताने पहिल्या डावात ४४५ धावा केल्या होत्या तर दुसऱ्या दिवशी बेन डकेटने इंग्लंडसाठी शतक झळकावले.
या दरम्यान, तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात उतरले आहेत. यानंतर चाहत्यांच्या मनात याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.
भारताचे माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड यांच्या स्मरणार्थ भारतीय क्रिकेट संघाने हातावर काळी पट्टी बांधली आहे. दत्ताजीराव गायकवाड यांनी १९५१ ते १९६२ दरम्यान भारतासाठी ११ कसोटी सामने खेळले होते. त्यांचे १३ फेब्रुवारी रोजी दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दत्ताजीराव गायकवाड हे माजी भारतीय फलंदाज आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचे वडीलही होते.
दत्ताजीराव गायकवाज हे उजव्या हाताचे फलंदाज होते आणि ते लेगस्पिन गोलंदाजीही करू शकत होते. १९५९ च्या इंग्लंड दौऱ्यात दत्ताजीराव गायकवाड भारताचे कर्णधार होते.
बीसीसीआयने तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी एक निवेदन जारी केले आहे. यात म्हटले आहे की, 'दिवंगत माजी भारतीय कर्णधार आणि भारताचे सर्वात वयस्कर कसोटी क्रिकेटपटू दत्ताजीराव गायकवाड यांच्या स्मरणार्थ टीम इंडिया हाताला काळी पट्टी बांधून मैदानात उतरेल.'
दरम्यान, या कसोटीत भारताने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ४४५ धावा केल्या. भारताकडून रोहित शर्माने १३१ धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. याशिवाय रवींद्र जडेजाने ११२ धावा केल्या. त्यानंतर आता इंग्लंडचा पहिला डाव सुरू आहे. इंग्लंडकडून बेन डकेटने शतकी खेळी खेळली.