Cricketers Reaction to Manmohan Singh Death : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी (२६ डिसेंबर) निधन झाले. गुरुवारी रात्री उशिरा मनमोहन सिंग यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिथे त्यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या निधनाच्या वृत्ताने क्रीडा जगतालाही प्रचंड दु:ख झाले आहे. त्यांच्या निधनावर अनेक खेळाडूंनी शोक व्यक्त केला आहे.
डॉ. मनमोहन सिंग २००४ मध्ये भारताचे १३ वे पंतप्रधान बनले आणि त्यांचा कार्यकाळ २०१४ पर्यंत चालला. भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते राजकारण, चित्रपट, उद्योग आणि क्रीडा जगतातील व्यक्तिमत्त्वांनीही भारताच्या माजी पंतप्रधानांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
एम्सने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, वाढत्या वयामुळे डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती खालावली होती. २६ डिसेंबर रोजी ते अचानक बेशुद्ध झाले आणि त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना गुरुवारी रात्री ८ वाजता एम्समध्ये दाखल करण्यात आले. सुमारे एक तास ४० मिनिटांनी त्यांना एम्समध्ये मृत घोषित करण्यात आले.
भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याने मनमोहन सिंग यांच्या निधनावर सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आणि लिहिले, “माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या आकस्मिक निधनाने मी दु:खी झालो आहे. ते एक अतिशय सज्जन व्यक्ती तसेच दूरदर्शी नेते होते.”
व्हीव्हीएस लक्ष्मण आणि युवराज सिंग यांनीही माजी पंतप्रधानांच्या निधनावर शोक व्यक्त केला आणि त्यांच्या कुटुंबीयांना आणि जवळच्या लोकांना शक्ती देवो अशी प्रार्थना केली.
हरियाणा विधानसभा निवडणुकीत जुलाना मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेल्या विनेश फोगट म्हणाल्या की, मनमोहन सिंग यांचे योगदान भारताच्या इतिहासात नेहमीच लक्षात राहील. शोकसंवेदना व्यक्त करताना, विनेशने देखील सांगितले की ते नेहमीच सर्वांच्या हृदयात जिवंत असतील'.
भारतीय महिला हॉकी संघाची माजी कर्णधार राणी रामपालपासून ते मुनाफ पटेल अनेकांनीशोक व्यक्त केला आहे.
भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगनेही मनमोहन सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. युवीने लिहिले, डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. एक दूरदर्शी नेता आणि सच्चा राजकारणी, ज्यांनी भारताच्या प्रगतीसाठी अथक परिश्रम घेतले. त्यांची बुद्धीमत्ता आणि विनम्रता सदैव स्मरणात राहील. त्यांच्या प्रियजनांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना.
संबंधित बातम्या