Rinku Singh Engagement : स्टार क्रिकेटर रिंकू सिंग हा समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांच्यासोबत लग्न करणार आहे. प्रिया सरोज या उत्तर प्रदेशातील मछली शहर लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. प्रियाच्या वडिलांनी एका न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले की, दोघांचे कुटुंबिय या नात्याशी सहमत आहेत. लवकरच एंगेजमेंटची तारीख ठरवली जाईल.
सध्या लखनऊमध्ये यूपी संघाचे शिबिर सुरू आहे. यूपी संघाशी संबंधित एका खेळाडूनेही नाव न सांगण्याच्या अटीवर या चॅनेलला सांगितले की, सरोजआणि रिंकूचे नाते निश्चित झाले आहे. लवकरच दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत.
दरम्यान, रिंकू सिंगची होणारी पत्नी प्रिया सरोज २५ वर्षांची आहे. त्या सर्वोच्च न्यायालयात वकील असून दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.
प्रिया सरोजचे वडील तुफानी सरोज हे देखील तीन वेळा लोकसभेचे खासदार राहिले आहेत. तुफानी सरोज सध्या समाजवादी पक्षाच्या तिकीटावर केरकट मतदारसंघातून आमदार आहेत.
प्रिया सरोज या समाजवादी पक्षाच्या खासदार आणि मच्छिलिशहरच्या खासदार आहेत. तीन वेळा खासदार आणि विद्यमान आमदार तुफानी सरोज यांच्या त्या कन्या आहेत. राजकीय कारकिर्दीपूर्वी प्रियाने कायद्याचे शिक्षण घेतले आहे. २०२४ मध्ये, त्यांनी भाजपच्या बीपी सरोज यांचा ३५८५० मतांच्या फरकाने पराभव करून त्यांची पहिली लोकसभा निवडणूक जिंकली.
टीम इंडियाला २२ जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध वनडे आणि टी-20 मालिका खेळायची आहे, ज्यामध्ये ५ टी-20 आणि ३ एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. आधी टी-20 मालिका होणार आहे, ज्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून त्यात रिंकू सिंगच्या नावाचाही समावेश आहे.
वनडे मालिकेची घोषणा होणे बाकी आहे, ज्यामध्ये रिंकूला स्थान मिळते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. रिंकू टीम इंडियासाठी सातत्याने चांगली कामगिरी करताना दिसत आहे. रिंकू सध्या उत्तर प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसत आहे.
रिंकू प्रामुख्याने भारतासाठी टी-२० क्रिकेट खेळतो. आतापर्यंत त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत दोन एकदिवसीय आणि ३० टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. रिंकूने एकदिवसीय सामन्याच्या दोन डावात ५५ धावा केल्या, ज्यामध्ये सर्वोच्च धावसंख्या ३८ धावा होती.
याशिवाय, T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या २२ डावांमध्ये रिंकूने ४६.०९ च्या सरासरीने आणि २६५ च्या स्ट्राईक रेटने ५०७ धावा केल्या आहेत. या कालावधीत, त्याने ३ अर्धशतके केली आहेत, ज्यामध्ये उच्च धावसंख्या ६९* धावा होती.
संबंधित बातम्या