Naman Ojha Father Jailed : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू नमन ओझा याचे वडील विनय ओझा यांना १.२५ कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी न्यायालयाने ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी एकूण चार जणांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. भारतीय क्रिकेटपटूच्या वडिलांना ७ वर्षांच्या शिक्षेसोबतच १४ लाख रुपयांचा अतिरिक्त दंडही ठोठावण्यात आला आहे.
२०१३ मध्ये मध्य प्रदेशातील जौलखेडा येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत पैशांचा अपहार झाल्याची घटना उघडकीस आली होती. आरोपींनी ३४ बनावट खाती उघडली होती आणि ती हस्तांतरित करून केसीसी कर्ज काढले होते.
या प्रकरणी २०१४ मध्ये गुन्हा दाखल झाला होता नमनचे वडील विनय ओझा यांच्याविरुद्ध २०१४ मध्ये फसवणुकीसह विविध कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून ते फरार होते. ८ वर्षांपासून पोलिस त्यांचा शोध घेत होते, त्यांना २०२२ मध्ये अटक झाली.
२०१३ मध्ये एकूण ६ जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला होता. आता अखेर ११ वर्षांनंतर न्यायालयाने अभिषेक रत्नम, ज्याला या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार म्हटले जाते, दोषी ठरवले आहे आणि त्याला १० वर्षांच्या कारावासाच्या व्यतिरिक्त ८० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
विनय ओझा हे त्यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रच्या जौलखेडा शाखेत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. दोषी आढळल्यानंतर त्यांना ७ वर्षांचा कारावास आणि १४ लाख रुपयांचा दंड भोगावा लागणार आहे. या घोटाळ्यात मध्यस्थांची भूमिका बजावणाऱ्या धनराज पवार आणि लखन हिंगवे यांनाही ७ वर्षांच्या तुरुंगवासासह ७ लाखांचा दंडही भरावा लागणार आहे.
या घटनेचा मुख्य सूत्रधार अभिषेक रत्नम याने बँक कर्मचाऱ्यांचे पासवर्ड वापरून ही फसवणूक केली होती. या प्रकरणाचा तपास सुरू केला असता, नमन ओझा याचे वडील विनय ओझा हे बँक ऑफ महाराष्ट्रच्या त्याच शाखेत काम करत होते आणि त्यांचा या फसवणूक प्रकरणाशी थेट संबंध असल्याचे निष्पन्न झाले.
तपास प्रक्रियेला बराच वेळ लागला आणि याच दरम्यान शाखेत रोखपाल पदावर असलेले दीनानाथ राठोड यांचे निधन झाले. प्रशिक्षणार्थी शाखा व्यवस्थापक नीलेश चटरोळे यांच्या आयडी आणि पासवर्डचा गैरवापर करण्यात आला होता. या प्रकरणात नीलेश चटरोळे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
अभिषेक रत्नम आणि विनय ओझा यांनी त्यांच्या एजंटांमार्फत बनावट खाती उघडून या माध्यमातून १.२५ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे वकील विशाल कोडळे यांनी उघड केले. न्यायालयाने एकूण ६ पैकी ४ जणांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे.
संबंधित बातम्या