भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आजपासून ॲडलेड ओव्हलवर झाला आहे. या पिंक बॉल टेस्टमध्ये टीम इंडिया अडचणीत सापडली आहे. डिनरपर्यंत टीम इंडियाचे ४ फलंदाज बाद झाले असून केवळ ८२ धावा झाल्या आहेत.
पिंक बॉल टेस्टमध्ये टीम इंडिया पुन्हा एकदा ढेपाळताना दिसत आहे. याआधी टीम इंडियाने पिंक बॉल टेस्ट २०२० मध्ये ऑस्ट्रेलियन भूमीवर खेळली होती. विशेष म्हणजे, तो सामनाही ॲडलेडमध्येच झाला होता. त्या सामन्यातील दुसऱ्या डावात भारतीय संघ अवघ्या ३६ धावांत गारद झाली होती.
अशा स्थितीत पिंक बॉल टेस्टमध्ये टीम इंडियाचा आतापर्यंत काय रेकॉर्ड राहिला आहे, हे जाणून घेऊया.
टीम इंडियाने आतापर्यंत गुलाबी चेंडूच्या ४ कसोटी खेळल्या आहेत. चारपैकी भारताने ३ सामने जिंकले आहेत. पिंक बॉल कसोटीत टीम इंडियाचा एकमेव पराभव २०२० मध्ये ॲडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाला होता.
अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या गुलाबी चेंडू कसोटीत टीम इंडिया कशी कामगिरी करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
पिंक बॉल कसोटीत टीम इंडियाने बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात आपली सर्वोच्च धावसंख्या केली. कोलकाता येथे बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या पिंक बॉल कसोटीत भारताने ९ बाद ३४७ धावा केल्या होत्या. तर टीम इंडियाने पिंक बॉल टेस्टमध्ये सर्वात कमी ३६ धावा ऑस्ट्रेलियाविरुद्ध केल्या होत्याय
पिंक बॉल कसोटीत भारतासाठी सर्वाधिक धावा विराट कोहलीने केल्या आहेत. कोहलीने आतापर्यंत ४६.१६ च्या सरासरीने २७७ धावा केल्या आहेत. त्यानंतर रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
रोहितने आत्तापर्यंत गुलाबी चेंडूच्या तीन कसोटी खेळल्या आहेत, ज्यात त्याने ४३.२५ च्या सरासरीने १७३ धावा केल्या आहेत. यानंतर श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर आहे. अय्यरने १ पिंक बॉल कसोटी खेळली, ज्यात त्याने ७९.५० च्या सरासरीने १५९ धावा केल्या.