गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक झाला आहे. बीसीसीआयने मंगळवारी (०९ जुलै) गंभीरला मुख्य प्रशिक्षक बनवल्याची माहिती शेअर केली. गंभीरने राहुल द्रविडची जागा घेतली. २०२४ च्या T20 विश्वचषकानंतर द्रविडचा कार्यकाळ संपला.
आता अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होत असेल की नवीन मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला किती पगार मिळणार? माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडपेक्षा गंभीरचा पगार कमी की जास्त? तर आपण येथे याबद्दलच माहिती जाणून घेणार आहोत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना वार्षिक १२ कोटी रुपये पगार देण्यात आला होता. म्हणजे द्रविडचा एका महिन्याचा पगार एक कोटी रुपये होता. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक हे हाय प्रोफाईल काम आहे, ज्यामुळे बीसीसीआय या पदावरील व्यक्तीला चांगला पगार देते. द्रविडने नोव्हेंबर २०२१ ते जून २०२४ पर्यंत टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले.
मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, गंभीरला राहुल द्रविडपेक्षा जास्त पैसे मिळू शकतात म्हणजेच वार्षिक १२ कोटी रुपयांपेक्षा जास्त. मात्र, नवे मुख्य प्रशिक्षक बनलेल्या गंभीरच्या पगाराची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, त्याला राहुल द्रविडपेक्षा जास्त पगार दिला जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
गंभीरचा कार्यकाळ किती काळ असेल?
गौतम गंभीरच्या कार्यकाळाची सुरुवात श्रीलंका दौऱ्यापासून होणार आहे. भारतीय संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. यानंतर टीम इंडिया २७ जुलै ते ७ ऑगस्ट दरम्यान श्रीलंका दौऱ्यावर ३ T20 सामन्यांची आणि ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेपासून गंभीरचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ सुरू होणार आहे. गंभीरचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२७ पर्यंत असेल.
गंभीरच्या कोचिंग कार्यकाळात, मेन इन ब्लू २०२६ चा टी-20 आणि २०२७ चा एकदिवसीय विश्वचषकासह अनेक महत्त्वाच्या ICC स्पर्धा खेळणार आहे.
गौतम गंभीर हा विश्वचषक विजेता खेळाडू आहे. टीम इंडियाने २००७ मध्ये पहिला T20 वर्ल्ड कप जिंकला होता. गंभीर हा त्या विजयी संघाचा भाग होता. त्यानंतर २०११ मध्ये भारतीय संघाने एकदिवसीय विश्वचषकाचे दुसरे जेतेपद पटकावले. या विजयी संघात गौतम गंभीरचाही समावेश होता.
संबंधित बातम्या