टीम इंडियाचा कर्णधार हिटमॅन रोहित शर्मा आज (३ ऑक्टोबर) कर्जत जामखेड येथे पोहोचला होता. रोहित शर्माने येथे एका क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन केले. वास्तविक, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात हे भव्य स्टेडियम बांधण्यात आले आहे.
रोहित शर्मा याच्या हस्ते या स्टेडिअमचे उद्धाटन झाले. कर्जत तालुक्यातील राशीन येथे सकाळी रोहित शर्मा पोहोचला, त्यानंतर त्याचे भव्य पद्धतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी रोहित शर्माने मराठीतून भाषण केले. रोहितला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती. यावेळी बोलताना रोहितने पुढचे यशस्वी जैस्वाल आणि जसप्रीत बुमराह याच ठिकाणहून येतील असे म्हटले, तेव्हा जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला.
रोहित शर्मा म्हणाला की, राशीनमध्ये येऊन मला खूप आनंद झाला. गेल्या तीन महिन्यांत आपल्या आयुष्यात बरेच काही घडले आहे. आमचे लक्ष्य टी-२० विश्वचषक जिंकण्याचे होते. विश्वचषक जिंकल्यानंतर माझ्या आयुष्यात पुन्हा जिवंतपणा आला. क्रिकेट हा सगळ्यांनाच आवडणारा खेळ आहे. आपण राशीनमध्ये क्रिकेट अकादमी सुरू करत आहोत आणि मला खात्री आहे की पुढील यशस्वी जैस्वाल, जसप्रीत बुमराह हे येथूनच मिळतील".
दरम्यान, या वेळी आमदार रोहित पवार यांनी रोहित शर्माला काही प्रश्न विचारले, त्याची उत्तरेही रोहित शर्माने त्याच्या स्टाईलमध्ये दिली.
राशीनमध्ये श्री माता अंबाबाईचे मंदिर आहे. या मंदिराला भेट देऊन आणि ग्रामीण भाग पाहून तुम्हाला कसे वाटले? असे विचारले असता, रोहित म्हणाला, मला खूप फ्रेश वाटत आहे. गाडीतून येथे येताना इथला ग्रामीण भाग पाहून आनंद झाला. या क्रिकेट अकादमीच्या माध्यमातून मी पुन्हा इथे येण्याचा प्रयत्न करेन'.