भारतीय क्रिकेट संघ बार्बाडोसहून दिल्लीला पोहोचला आहे. टी-20 विश्वचषक २०२४ जिंकल्यानंतर टीम इंडिया चक्री वादळामुळे काही दिवस बार्बाडोसमध्ये अडकली होती, त्यानंतर चाहते रोहित आणि कंपनीची आतुरतेने वाट पाहत होते.
मात्र, आज त्यांची प्रतीक्षा संपली आहे. मायदेशी परतताच भारतीय संघातील खेळाडूंमध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. दिल्लीत पाऊल ठेवल्यानंतर खेळाडूंचा उत्साह इतका वाढला की कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्यासह अनेक खेळाडू रस्त्यावरच नाचू लागले.
'पीटीआय' या वृत्तसंस्थेने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा नाचताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजही नाचताना दिसला.
हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर भारतीय खेळाडूंनी डान्स केला. खेळाडूंच्या स्वागतासाठी हॉटेलच्या गेटवर ढोल-ताशे आणि सर्व वस्तू उपस्थित होत्या. ढोल पाहून सूर्यकुमार यादवला स्वतःला रोखू शकला आला नाही. ढोलच्या तालावर सूर्याने जोमाने भांगडा केला. सूर्यामध्ये अद्भुत ऊर्जा दिसत होती. यावेळी सूर्यकुमार यादवच्या गळ्यात विजयी पदकदेखील दिसले.
सूर्यकुमार यादवने फायनलमध्ये शानदार कॅच घेऊन टीम इंडियाला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाचं योगदान दिलं होतं. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात सूर्याने शेवटच्या षटकात डेव्हिड मिलरचा झेल घेतला. शेवटच्या षटकात आफ्रिकेला विजयासाठी १६ धावांची गरज होती.
शेवटचे षटक हार्दिक पांड्याने टाकले. या षटकातील पहिल्याच चेंडूवर डेव्हिड मिलरने बॅट जोरात फिरवली. चेंडू बॅटला कनेक्ट होऊन थेट सीमारेषेवर गेला, पण सीमारेषेवर सूर्यकुमारने अप्रतिम झेल घेतला. या झेलनंतर सामना टीम इंडियाच्या बाजूने आला.
वादळात अडकेल्या टीम इंडियासाठी ४ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बीसीसीआयने एअर इंडियाला एसओएस कॉल करून चार्टर विमान पाठवण्याची विनंती केली. यानंतर चॅम्पियन्स २४ विश्वचषक AIC24WC हे एअर इंडियाचे विशेष चार्टर विमान बार्बाडोसहून बुधवारी पहाटे ४ वाजून ५० मिनिटांनी रवाना झाले आणि १६ तासांच्या अविरत प्रवासानंतर गुरुवारी (४ जुलै) सकाळी ६ वाजता दिल्लीत दाखल झाले.
शेवटी १६ तासांच्या थकवणाऱ्या प्रवासानंतर टीम इंडिया दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळवार दाखल झाली. येथे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. आज टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. यानंतर मुंबईत संध्याकाळी ५ वाजत चॅम्पियन संघाची खुल्या बसमधून मरिन ड्राइव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत रोड शो होणार आहे.
संबंधित बातम्या