चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार १९ फेब्रुवारीपासून रंगणार आहे. आयसीसीच्या या मेगा स्पर्धेला आता केवळ एक महिना उरला आहे. या स्पर्धेत भारत आपले सामने दुबईत खेळणार असून पहिला सामना २० फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध होणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला आहे.
दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची निवड करण्यासाठी जेव्हा निवड समिती बसेल, तेव्हा त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
दुबईची संथ खेळपट्टी लक्षात घेता या स्पर्धेत फिरकीपटूंची भूमिका महत्वाची ठरणार आहे. अशा स्थितीत भारतीय निवड समिती तीन फिरकीपटूंचा संघात समावेश करू शकतात. रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या संघात स्थान मिळवण्यासाठी चुरस रंगली आहे. पण प्लेइंग इलेव्हनमध्ये फक्त दोनच फिरकीपटू खेळतील.
वनडे वर्ल्डकप २०२३ च्या फायनलनंतर भारताने ६ एकदिवसीय सामने खेळले. या सामन्यांमध्ये रवींद्र जडेजाला स्थान देण्यात आले नव्हते. व्हाइट बॉल फॉर्मेटमध्ये जडेजाचा फॉर्म तितकासा चांगला राहिला नाही आणि सूत्रांच्या माहितीनुसार निवड समितीला एकदिवसीय सामन्यांमध्ये अक्षर पटेल हा एक चांगला पर्याय वाटतो. जडेजा आणि अक्षर दोघेही फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही मास्टर्स आहेत.
दरम्यान, वॉशिंग्टन सुंदरची निवड निश्चित वाटत असली तरी निवड समिती कुलदीप यादवच्या फिटनेसवर लक्ष ठेवून आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या बंगळुरू कसोटीदरम्यान कुलदीप यादवला दुखापत झाली होती. पण आता तो पूर्णपणे तंदुरुस्त दिसत असला तरी विजय हजारे ट्रॉफीमध्ये एकही सामना खेळला नाही. तो खेळला नाही तर रवी बिश्नोई किंवा वरुण चक्रवर्तीला संधी मिळू शकते.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हे खेळाडू दावेदार: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती किंवा रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज , अर्शदीप सिंग, आवेश खान किंवा मोहम्मद शमी, रिंकू सिंग किंवा तिलक वर्मा.