आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ वरून भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरू आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला आहे. आता अशातच भारताने आपला अंध क्रिकेट संघही पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला आहे.
अंधांचा टी-20 क्रिकेट वर्ल्डकप पाकिस्तानात होणार आहे. पण भारताने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. पाकिस्तानमध्ये २३ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या अंध टी-२० विश्वचषक स्पर्धेतून भारताने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तान पहिल्यांदाच ब्लाइंड टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. या स्पर्धेत भारत तीन वेळा चॅम्पियन आहे.
क्रीडा मंत्रालयाने नुकतीच अंध क्रिकेट संघाला टी-20 विश्वचषकात सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला जाण्याची परवानगी दिली, पण परराष्ट्र मंत्रालयाने याला विरोध केला.
भारतीय अंध क्रिकेट संघटनेचे सरचिटणीस शैलेंद्र यादव म्हणाले की, परराष्ट्र मंत्रालयाने आम्हाला पाकिस्तानला जाण्याची परवानगी दिली नाही आणि स्पर्धेतून माघार घेण्यास सांगितले. सरकारकडून अद्याप अधिकृत नकार पत्र मिळालेले नाही आणि पाकिस्तानला जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही, असे तोंडी सांगण्यात आले आहे, असेही यादव यांनी स्पष्ट केले.
गेल्या २५ दिवसांपासून आम्ही पाकिस्तानला जाण्यासाठी सरकारच्या परवानगीची वाट पाहत होतो. स्पर्धा सुरू होत असल्याने आम्ही आणखी वाट पाहू शकत नाही. मी परराष्ट्र मंत्रालयाशी फोनवर बोललो तेव्हा त्यांनी आम्हाला पाकिस्तानात जाऊ दिले जाणार नाही, असे सांगितले. मंजुरी नाकारण्याचे अधिकृत पत्र दिले जाईल, असे सांगण्यात येईल.
मात्र, अद्याप आम्हाला कोणतेही अधिकृत पत्र मिळालेले नाही. पण परराष्ट्र मंत्रालयाशी झालेल्या चर्चेच्या आधारे आम्ही पाकिस्तानला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही ब्लाइंड टी-२० विश्वचषकात भाग घेणार नाही.
भारताने माघार घेतल्यानंतर अफगाणिस्तान, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, नेपाळ आणि श्रीलंकेचे संघ अंध विश्वचषकात सहभागी होतील. पाकिस्तान ब्लाइंड क्रिकेट कौन्सिलने नुकतेच म्हटले आहे की, भारतीय संघ सहभागी असो वा नसो, स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसारच होईल.
यूएनएससीचे अध्यक्ष सय्यद सुलतान शाह म्हणाले की, पाकिस्तान नियोजित वेळापत्रकानुसार ही स्पर्धा आयोजित करेल. भारतीय संघ सहभागी असो वा नसो, या स्पर्धेवर काहीही फरक पडणार नाही. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या इतर संघांनी पाकिस्तानात खेळण्यास कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट केले आहे. "