Rape Case Accused Nikhil Chaudhary : भारतीय वंशाचा निखिल चौधरी ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग (BBL) मध्ये होबार्ट हरिकेन्सकडून खेळतो. याच निखिल चौधरीवर क्वीन्सलँडमध्ये एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. मात्र, भारतीय वंशाच्या ऑस्ट्रेलियन खेळाडूने आपण निर्दोश असल्याचे सांगितले आहे.
बिग बॅश लीगमध्ये खेळणाऱ्या निखिल चौधरी या भारतीयाने टाऊन्सविले येथील एका नाईट क्लबमध्ये महिलेला भेटल्यानंतर त्याच्या कारमध्ये तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप एका ऑस्ट्रेलियन चॅनेलने केला आहे. सोमवारी या प्रकरणाची सुनावणी झाली. यामध्ये निखिल चौधरीने स्वत:ला निर्दोष घोषित केले.
निखिल भारतातील पंजाबकडून देशांतर्गत क्रिकेट खेळला आहे. पण तो ऑस्ट्रेलियाला गेला आणि क्रिकेटसोबतच पोस्टमन म्हणूनही काम केले. निखिल २०२० मध्ये सुट्टीसाठी ऑस्ट्रेलियाला गेला होता, पण कोविडमुळे तो तिथेच राहिला. तेथे त्याच्या दीर्घ मुक्कामामुळे, निखिलने ब्रिस्बेनमधील नॉर्दर्न सबर्ब्स डिस्ट्रिक्ट क्रिकेट क्लबकडून खेळण्यास सुरुवात केली आणि तेथे चांगली कामगिरी केल्यानंतर २०२३ च्या उत्तरार्धात त्याची होबार्ट हरिकेन्सने त्यांच्या संघात निवड केली.
निखिल चौधरीने बीबीएलमध्ये होबार्ट हरिकेन्ससाठी आतापर्यंत एकूण ९ सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या ६ डावात फलंदाजी करताना निखिलने १४२.५९ च्या स्ट्राइक रेटने १५४ धावा केल्या आहेत. याशिवाय ७ डावात गोलंदाजी करताना निखिलने ५ विकेट्स घेतल्या आहेत.
भारतात पंजाबकडून देशांतर्गत क्रिकेट खेळताना निखिलने २ लिस्ट ए आणि २१ टी-20 सामने खेळले आहेत. दोन लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याने २५ धावा केल्या आहेत आणि गोलंदाजीत १ बळी घेतला आहे. याशिवाय त्याने T20 च्या १६ डावात २६० धावा केल्या आणि गोलंदाजीत १२ विकेट्स घेतल्या.