INDW vs SAW Final Women Under 19 T20 World Cup : टीम इंडियाने ICC महिला अंडर १९ टी-20 विश्वचषकाचे जेतेपद पटकावले आहे. रविवारी (२ फेब्रुवारी) क्वालालंपूरच्या ब्युमास ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ९ विकेट्सनी पराभव केला.
अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रथम खेळताना अवघ्या ८२ धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात टीम इंडियाने केवळ एक फलंदाज गमावून ८३ धावांचे लक्ष्य गाठले. जे भारताने केवळ ११.२ षटकात पूर्ण केले. सलामीची फलंदाज गोंगडी त्रिशाने भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्रिशाने गोलंदाजीत ३ बळी घेतले, तर फलंदाजीत नाबाद ४४ धावा केल्या.
तत्पूर्वी, टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय आफ्रिकन संघाला महागात पडला कारण धावसंख्या ४४ धावा होईपर्यंत अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. दक्षिण आफ्रिकेच्या संघातील १० पैकी केवळ ४ फलंदाजच दुहेरी आकडा गाठू शकले. आफ्रिकन संघाच्या फलंदाजीची अवस्था इतकी बिकट होती की त्यांनी शेवटच्या ५ विकेट ९ धावांत गमावल्या.
यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. जी कमलिनी आणि गोंगडी त्रिशा यांनी मिळून ४.३ षटकात ३६ धावांची भागीदारी केली. पण कमिलीनी ८ धावा करून कायला रेनेकेच्या चेंडूवर सिमोन लॉरेन्सकरवी झेलबाद झाली.
येथून गोंगडी आणि सानिका चाळके यांनी अप्रतिम भागीदारी करत भारताला विजयापर्यंत नेले. त्रिशाने ३३ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीने नाबाद ४४ धावा केल्या. सानिका चाळके २६ धावा केल्या.
भारताने सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेची पहिली आवृत्ती २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत झाली होती, ज्यामध्ये शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चॅम्पियन बनला होता.
यावेळीही भारतीय संघाची कामगिरी उत्कृष्ट राहिली. भारताने या स्पर्धेतील सातही सामने जिंकले आहेत. निकी प्रसाद हिच्या नेतृत्वाखालील संघाने तिन्ही विभागात चांगली कामगिरी केली आहे.
संबंधित बातम्या