Rajkot Test, India Vs England 3rd Test, Day 4 : राजकोट कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा ४३४ धावांनी धुव्वा उडवला आहे. या सामन्यात भारताने इंग्लंडला विजयासाठी ५५७ धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लिश संघ १२२ धावांत गारद झाला.
सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या (१८ फेब्रुवारी) अखेरच्या सत्रात इंग्लंडचा संघ १२२ धावांवर सर्वबाद झाला. या विजयासह रोहित ब्रिगेडने ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. कसोटी मालिकेतील चौथा सामना २३ फेब्रुवारीपासून रांची येथे खेळवला जाणार आहे.
कसोटी इतिहासातील धावांच्या बाबतीत भारतीय संघाचा हा सर्वात मोठा विजय आहे. याआधी डिसेंबर २०२१ मध्ये भारताचा सर्वात मोठा विजय झाला होता. त्यावेळी वानखेडे कसोटी सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ३७२ धावांनी पराभव केला होता.
दरम्यान, इंग्लंडकडून मार्क वुडने दुसऱ्या डावात सर्वाधिक ३३ धावा केल्या. तर भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक ५ बळी घेतले. कुलदीप यादवने दोन बळी घेतले.
४३४ वि. इंग्लंड राजकोट २०२४
३७२ वि. न्यूझीलंड मुंबई २०२१
३३७ वि. दक्षिण आफ्रिका दिल्ली २०१५
३२१ वि. न्यूझीलंड इंदूर २०१६
३२० वि. ऑस्ट्रेलिया मोहाली २००८
या सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर भारताने पहिल्या डावात ४४५ धावा केल्या. पहिल्या डावात भारताकडून रोहित शर्माने १३१ आणि रविंद्र जडेजाने ११२ धावा केल्या.
प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव ३१९ धावांत आटोपला. इंग्लंडकडून पहिल्या डावात बेन डकेटने सर्वाधिक १५३ धावा केल्या. इंग्लंड ३१९ धावांत गारद झाल्यानंतर भारताला १२६ धावांची मोठी आघाडी मिळाली.
यानंतर भारताने आपला दुसरा डाव दुसरा डाव ४ बाद ४३० धावांवर घोषित केला. दुसऱ्या डावात भारताकडून यशस्वी जैस्वालने सर्वाधिक २१४ धावांची खेळी केली. अशाप्रकारे पहिल्या डावातील आघाडी आणि दुसऱ्या डावातील ४३० धावा मिळून इंग्लंडला विजयासाठी ५५७ धावांचे लक्ष्य मिळाले.
या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ ३९.५ षटकात १२२ धावांवर गारद झाला. भारताकडून दुसऱ्या डावात जडेाने ५ बळी घेतले. जडेजाने १२.४ षटकांत ४१ धावा दिल्या. कुलदीपला २ बळी मिळाले. या डावात बुमराह आणि अश्विनने प्रत्येकी एक विकेट घेतली.