India vs New Zealand, Final : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळली गेली. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ४ विकेट्सनी धुव्वा उडवत तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.
भारतासमोर विजयासाठी २५२ धावांचे लक्ष्य होते, जे त्याने ४९व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पूर्ण केले.
भारतीय संघाने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. २००२ मध्ये भारतीय संघ पहिल्यांदा चॅम्पियन बनला होता. त्यावेळी भारताने श्रीलंकेसोबत संयुक्तपणे जेतेपदाची कमाई केली होती. त्यानंतर एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २०१३ साली चॅम्पियन बनला. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने इतिहास रचला आहे.
तत्पूर्वी, लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी मिळून पहिल्या विकेटसाठी १०५ धावांची शतकी भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान रोहित शर्मा अधिक आक्रमक मूडमध्ये दिसला. रोहितने अवघ्या ४१ चेंडूंत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले.
तर गिलने संथ फलंदाजी केली. भारताची पहिली विकेट १९ व्या षटकात पडली, जेव्हा मिचेल सँटनरने गिलला ग्लेन फिलिप्सकरवी झेलबाद केले. गिलने ५० चेंडूत १ षटकाराच्या मदतीने ३१ धावा केल्या. यानंतर भारताने विराट कोहलीची विकेट स्वस्तात गमावली, जो १ धाव करून मायकल ब्रेसवेलच्या चेंडूवर LBW आऊट झाला.
त्यानंतर मोठा फटका मारण्याच्या रोहित शर्मा बाद झाला. तो रचिन रवींद्रच्या चेंडूवर यष्टिचित झाला. रोहितने ८३ चेंडूंत ७६ धावा केल्या, ज्यात ७ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. रोहित शर्मा बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात १२२ धावा होती.
रोहित बाद झाल्यानंतर अक्षर पटेल आणि श्रेयस अय्यर यांनी मिळून चौथ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी करून भारताचा डाव सावरला. श्रेयस अय्यर दुर्दैवी ठरला कारण तो आपले अर्धशतक पूर्ण करू शकला नाही.
श्रेयस अय्यरने ६२ चेंडूत ४८ धावा केल्या, ज्यात २ षटकार आणि तब्बल चौकारांचा समावेश होता. श्रेयसला मिचेल सँटनरने रचिन रवींद्रच्या हाती झेलबाद केले. त्यानंतर ब्रेसवेलच्या चेंडूवर विल्यम ओ’रुर्केकरवी झेलबाद झालेल्या अक्षर पटेलची (२९) विकेटही भारताने गमावली. श्रेयस अय्यर बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या पाच गड्यांच्या मोबदल्यात २०३ धावा होती.
येथून केएल राहुलने शानदार ३४ धावांची खेळी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. हार्दिक पंड्या (१८) आणि रवींद्र जडेजा (९*) यांनीही उपयुक्त खेळी खेळली.
न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर रचिन रवींद्र आणि विल यंग यांनी किवींना शानदार सुरुवात करून दिली. रचिन रवींद्र आणि विल यंग यांनी मिळून ७.५ षटकांत ५७ धावांची भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान रवींद्रला प्रथम मोहम्मद शमी आणि नंतर श्रेयस अय्यरने झेलबाद केले. विल यंगला (१५) LBW बाद करणाऱ्या वरुण चक्रवर्तीने अखेर भारताला पहिले यश मिळवून दिले.
त्यानंतर कुलदीप यादवने रचिन रवींद्रला गोलंदाजी करत भारताला दुसरे यश मिळवून दिले. रवींद्रने २९ चेंडूंत ४ चौकार आणि १ षटकारासह ३७ धावा केल्या. यानंतर कुलदीपने अनुभवी फलंदाज केन विल्यमसनलाही बाद करत स्वताच्याच गोलंदाजीवर त्याचा झेल घेतला.
केन विल्यमसन (११) बाद झाला तेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या ३ बाद ७५ धावा होती. यानंतर डॅरिल मिशेल आणि टॉम लॅथम यांनी किवींचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी केली. रवींद्र जडेजाने लॅथमला (१४) LBW बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली.
चौथी विकेट १०८ धावांवर पडल्यानंतर मिशेलने ग्लेन फिलिप्ससोबत पाचव्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली.
ग्लेन फिलिप्सला फिरकीपटू वरुण चक्रवर्तीची गुगली वाचता आली नाही आणि तो बोल्ड झाला. फिलिप्सने ५२ चेंडूत २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३४ धावा केल्या.
फिलिप्स बाद झाल्यानंतर काही वेळातच डॅरिल मिशेलने ९१ चेंडूत अर्धशतक केले. मिशेल ६३ धावा करून बाद झाला. मिचेलने १०१ चेंडूंच्या खेळीत ३ चौकार मारले. मिचेलला मोहम्मद शमीने कर्णधार रोहित शर्माकरवी झेलबाद केले.
येथून मायकेल ब्रेसवेलने तुफानी खेळी करत न्यूझीलंडला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले. ब्रेसवेलने ४० चेंडूंत नाबाद ५३ धावा केल्या, ज्यात कर्णधार मिचेल सँटनरसह २८ धावा जोडल्या. सँटनर ८ धावा करून धावबाद झाला. भारतातर्फे वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. तर मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी १ विकेट मिळाली.
संबंधित बातम्या