IND vs Eng 4th Test Scorecard : टीम इंडियाने रांची कसोटी ५ विकेट्सनी जिंकली आहे. कसोटीच्या चौथ्या दिवशी (२६ फेब्रुवारी) भारताने १९२ धावांचे लक्ष्य ५ गड्यांच्या मोबदल्यात गाठले. या विजयासह भारतीय संघाने ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. पाचवी आणि शेवटची कसोटी मालिका ७ मार्चपासून धरमशाला येथे खेळवली जाणार आहे.
टीम इंडियाचा घरच्या मैदानावर सलग १७ वा मालिका विजय आहे. २०१२ मध्ये ॲलिस्टर कुकच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय संघ घरच्या भूमीवर सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. भारताने २०१२ पासून आतापर्यंत खेळलेल्या ४८ कसोटी सामन्यांपैकी ३९ सामने जिंकले आहेत.
१९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी ८४ धावांची भागीदारी करून भारताला चांगली सुरुवात करून दिली. दोन्ही फलंदाजांनी चांगल्या चेंडूंना आदर दिला, तर खराब चेंडूंना सीमापार पाठवले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत (२५ फेब्रुवारी) दोघांनी मिळून ४० धावा जोडल्या होत्या.
त्यानंतर आज रोहित शर्माने जेम्स अँडरसनच्या चेंडूवर षटकार खेचून भारताची धावसंख्या ५० च्या पुढे नेली. त्यानंतर यशस्वीनेही काही चांगले फटके मारले.
भारताला पहिला धक्का यशस्वी जैस्वालच्या रूपाने बसला, तो पार्टटाइम फिरकी गोलंदाज जो रूटच्या चेंडूवर जेम्स अँडरसनच्या हाती झेलबाद झाला. यशस्वी बाद झाल्यानंतर काही वेळातच रोहितने आपले अर्धशतक पूर्ण केले. रोहित ५५ धावा करून टॉम हार्टलीच्या चेंडूवर विकेटच्या मागे झेलबाद झाला. त्यानंतर रजत पाटीदारची (००) विकेटही भारताने गमावली.
उपाहारानंतर शोएब बशीरने रवींद्र जडेजा आणि सर्फराज खानला लागोपाठच्या चेंडूंवर बाद करत सामना रोमांचक टप्प्यावर नेला. १२० धावांत ५ गडी बाद झाल्याने भारताला उपयुक्त भागीदारीची नितांत गरज होती. अशा परिस्थितीत ध्रुव जुरेल आणि शुभमन गिल यांनी चाहत्यांना निराश न करता भारताला संकटातून बाहेर काढले आणि विजयाकडे नेले. गिल आणि जुरेल यांनी सहाव्या विकेटसाठी ७२ धावांची नाबाद भागीदारी केली.
तत्पूर्वी, इंग्लंडने टॉस जिंकून पहिल्या डावात ३५३ धावा केल्या होत्या. यानंतर भारतीय संघाचा पहिला डाव ३०७ धावांवर आटोपला. म्हणजेच पहिल्या डावाच्या आधारे इंग्लंडकडे ४६ धावांची आघाडी होती. यानंतर इंग्लंडचा दुसरा डाव १४५ धावांवर आटोपला आणि भारताला विजयासाठी तुलनेने सोपे लक्ष्य मिळाले.