Women's T20 WC : एका जागेसाठी तीन संघांत चुरस, सेमी फायनल गाठण्यासाठी भारताला काय करावं लागेल? फक्त विजय पुरेसा नाही
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Women's T20 WC : एका जागेसाठी तीन संघांत चुरस, सेमी फायनल गाठण्यासाठी भारताला काय करावं लागेल? फक्त विजय पुरेसा नाही

Women's T20 WC : एका जागेसाठी तीन संघांत चुरस, सेमी फायनल गाठण्यासाठी भारताला काय करावं लागेल? फक्त विजय पुरेसा नाही

Oct 13, 2024 12:17 PM IST

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण ३४ सामने झाले आहेत, त्यापैकी भारताने ७ जिंकले आहेत तर कांगारूंनी २५ जिंकले आहेत. एक सामना टाय झाला. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर संध्याकाळी ७ वाजल्यापासून होणार आहे.

Women's T20 WC : सेमी फायनल गाठण्यासाठी भारताला काय-काय करावं लागणार? फक्त विजय पुरेसा नाही
Women's T20 WC : सेमी फायनल गाठण्यासाठी भारताला काय-काय करावं लागणार? फक्त विजय पुरेसा नाही (AP)

महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवायच्या असतील, तर आज (१३ ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियाला मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेल. न्यूझीलंडविरुद्धचा पहिला सामना गमावल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि श्रीलंकेला पराभूत करून स्पर्धेत पुनरागमन केले.

भारताने श्रीलंकेचा ८२ धावांनी पराभव केला, हा स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय आहे. त्यामुळे भारताचा नेट रनरेटही मायनसमधून ते प्लसमध्ये बदलला आणि सेमी फायनल गाठण्याची शक्यताही बळकट झाली.

दुसऱ्या स्थानासाठी तीन संघांमध्ये चुरस

अ गटात ऑस्ट्रेलियाचे तीन सामन्यांतून ६ गुण आहेत आणि त्यांचा नेट रनरेट + २.७८६ आहे. ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला आहे तर उर्वरित एका स्थानासाठी भारत, न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात चुरस आहे. अ गटात सध्या भारत दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर आहे.

संपूर्ण लढाई नेट रन रेटवर आधारित

भारताचे ४ गुण आहेत आणि बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी एक विजय आवश्यक आहे कारण न्यूझीलंडला अजून एक सामना खेळायचा आहे आणि ते ६ गुणांसह अंतिम चारमध्ये पोहोचू शकतात.

अशा स्थितीत प्रकरण नेट रन रेटवर येईल. भारताचा नेट रनरेट सध्या + ०.५६७ आहे तर न्यूझीलंडचा - ०.०५० आहे. पाकिस्तानचे तीन सामन्यांतून दोन गुण आहेत.

जर त्यांनी शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडला हरवले आणि भारत ऑस्ट्रेलियाकडून हरला तर सर्व संघांचे ४ गुण होतील. यानंतरही नेट रनरेट महत्वाचा ठरणार आहे. त्यामुळे भारतीय संघाला फक्त जिंकायचे नाही तर मोठ्या फरकाने जिंकायचे आहे.

नव्या कर्णधारासह मैदानात उतरणार संघ!

गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी पाकिस्तानचा पराभव केला, परंतु सामन्यादरम्यान कर्णधार ॲलिसा हिलीला क्षेत्ररक्षण करताना तिच्या पायाला दुखापत झाली आणि वेगवान गोलंदाज टायला व्लाएमिंक हिच्या खांद्याला दुखापत झाली. टायला स्पर्धेबाहेर असून भारताविरुद्धच्या सामन्यात हिलीचा सहभागही निश्चित नाही.

हिलीच्या अनुपस्थितीचा भारताला फायदा होऊ शकतो. हीलीने भारताविरुद्ध २९ टी-20 सामने खेळले असून त्यात तिने ५ अर्धशतकांसह ५७८ धावा केल्या आहेत.

हिली खेळली नाही तर ऑस्ट्रेलियाला नवा कर्णधार, यष्टिरक्षक आणि सलामीवीर शोधावा लागेल. बेथ मुनी यष्टीरक्षण करू शकते तर उपकर्णधार ताहलिया मॅकग्राकडे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते.

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: शेफाली वर्मा, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (यष्टीरक्षक), सजीवन सजना, दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, आशा शोभना, रेणुका सिंग.

ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: ॲलिसा हिली (कर्णधार), बेथ मूनी, एलिस पेरी, फोबी लिचफिल्ड, ग्रेस हॅरिस, ऍशले गार्डनर, जॉर्जिया वेरेहॅम, ताहलिया मॅकग्रा, ॲनाबेल सदरलँड, सोफिया मोलिनेक्स, मेगन शूट.

Whats_app_banner