महिला टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताने आज (९ ऑक्टोबर) श्रीलंकेचा ८२ धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने सेमी फायनलच्या आशा कायम ठेवल्या आहेत. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने २० षटकांत ३ बाद १७२ धावा केल्या होत्या.
अशाप्रकारे श्रीलंकेसमोर १७३ धावांचे लक्ष्य होते, पण चमारी अटापट्टूच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेचा संघ १९.५ षटकांत अवघ्या ९० धावांवरच गारद झाला.
या सामन्यात अरुंधती रेड्डी आणि आशा शोभना यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. तर रेणुकाने दोन तर श्रेयंका आणि दीप्तीला प्रत्येकी एक विकेट मिळाली.
श्रीलंकेकडून कविष्का दिलहरीने सर्वाधिक २१ धावा केल्या. तर अनुष्का संजीवनीने २२ चेंडूत २० धावांची खेळी केली. अमा कांचनाने २२ चेंडूत १९ धावांचे योगदान दिले, मात्र याशिवाय इतर ८ फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले नाहीत.
श्रीलंकेची सर्वात मोठी आशा, कर्णधार चमारी अटापट्टू अवघी १ धाव करून पॅव्हेलियनमध्ये परतली.
टी-20 विश्वचषकात टीम इंडियाने आपला पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध गमावला होता. तर दुसरा सामना पाकिस्तानविरुद्ध जिंकला होता. आता तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा धुव्वा उडवत उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. भारताचा पुढचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे. तो सामनाही महत्वाचा आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने दमदार सुरुवात केली होती. स्मृती मानधनाने ३८ चेंडूत सर्वाधिक ५० धावा केल्या. याशिवाय शेफाली वर्माने ४० चेंडूत ४३ धावांचे योगदान दिले.
त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने तुफानी खेळी केली. भारतीय कर्णधाराने २७ चेंडूत ५२ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ८ चौकार आणि १ षटकार मारला.
तत्पूर्वी, भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी शानदार सुरुवात केली. भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी १२.४ षटकात ९८ धावा जोडल्या.
मात्र, यानंतर स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा लागोपाठ चेंडूंवर माघारी परतल्या. यानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमाह रॉड्रिग्सने वेगाने धावा केल्या. जेमिमाह रॉड्रिग्जने १० चेंडूत १६ धावा केल्या. त्याचवेळी ऋचा घोषने ६ चेंडूत ६ धावा केल्यानंतर नाबाद राहिली, पण तिने आपल्या कर्णधाराला चांगली साथ दिली. हरमनप्रीत कौर आणि ऋचा घोष यांच्यात २२ चेंडूत ४४ धावांची भागीदारी झाली.
श्रीलंकेकडून चमारी अटापट्टू आणि आना कांचना यांनी १-१ बळी घेतला, परंतु याशिवाय इतर गोलंदाजांना यश मिळाले नाही.
संबंधित बातम्या