भारत आणि कॅनडा यांच्यातील सामना (१५ जून) पावसामुळे रद्द करावा लागला. अशा प्रकारे दोन्ही संघांना १-१ गुण मिळाले. मात्र, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ यापूर्वीच सुपर-८ फेरीसाठी पात्र ठरला होता.
टीम इंडिया ४ सामन्यांत ७ गुणांसह गटात अव्वल स्थानावर आहे. तथापि, भारत आणि कॅनडा यांच्यातील सामना रद्द झाला, परंतु भारतीय चाहत्यांसाठी एक चांगला योगायोग घडला आहे.
खरं तर, टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा एक गट सामना जेव्हा पावसामुळे वाहून गेला, तेव्हा भारत चॅम्पियन झाला होता. त्यामुळे या योगायोगामुळे टीम इंडिया पुन्हा जेतेपद पटकावेल, अशी आशा भारतीय चाहत्यांना आहे.
वास्तविक, हा T20 विश्वचषक २००७ चा योगायोग आहे. टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी भारतीय संघ महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेत पोहोचला होता. भारताचा पहिला सामना स्कॉटलंडशी होता, मात्र हा सामना पावसामुळे वाहून गेला. यानंतर भारतीय संघ पाकिस्तान, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या संघांना पराभूत करून विश्वविजेता बनला.
भारतीय संघ सुपर-८ फेरीत पोहोचला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने साखळी फेरीत आयर्लंड, पाकिस्तान आणि अमेरिकेचा पराभव केला. तर भारत आणि कॅनडा यांच्यातील सामना पावसामुळे वाहून गेला.
आतापर्यंत भारताच्या सुपर-८ फेरीतील २ सामने निश्चित झाले आहेत. भारतीय संघ सुपर-८ फेरीत आपला पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे. भारत आणि अफगाणिस्तानचे संघ २० जूनला आमनेसामने येणार आहेत. यानंतर २४ जूनला भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने येणार आहेत.