टी-20 विश्वचषक चॅम्पियन भारतीय संघ ५ टी-20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला आहे. आज म्हणजेच शनिवारी (६ जुलै) भारताचा पहिला T20 सामना झिम्बाब्वेची राजधानी हरारे येथे भारतीय वेळेनुसार दुपारी ४:३० वाजता होणार आहे. युवा खेळाडूंनी भरलेल्या भारतीय संघाचे नेतृत्व शुभमन गिल करणार आहे. या संघात ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग आणि रवी बिश्नोई यांचा समावेश आहे.
लाइव्ह स्ट्रिमिंग: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी-20 मालिकेचे लाईव्ह स्ट्रिमिंग SONY LIV अॅपवर पाहता येणार आहे..
लाइव्ह टेलिकास्ट: सोनी स्पोर्ट्स टेन ५, सोनी स्पोर्ट्स टेन ५ एचडी, सोनी स्पोर्ट्स टेन ३, सोनी स्पोर्ट्स टेन ३ एचडी, सोनी स्पोर्ट्स टेन ४ आणि सोनी स्पोर्ट्स टेन ४ एचडी.
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिला T20 सामना ६ जुलै रोजी होणार आहे. दुसरा T20 सामना ७ जुलै रोजी, तिसरा T20 सामना १० जुलै रोजी, चौथा T20 सामना १३ जुलै रोजी आणि पाचवा आणि अंतिम T20 सामना १४ जुलै रोजी खेळवला जाईल. टी-20 मालिकेतील सर्व सामने हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवले जातील.
झिम्बाब्वेविरुद्ध आजच्या सामन्यात काही नवे खेळाडू टीम इंडियासाठी पदार्पण करू शकतात, ज्यात अभिषेक शर्मा, रियान पराग आणि हर्षित राणा यांचा समावेश आहे. या तिन्ही खेळाडूंनी आयपीएल २०२४ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती.
ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मा हे ओपनिंगला खेळू शकतात. शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकतो. अभिषेक संघासाठी उत्तम सलामीवीर ठरू शकतो. अभिषेकने आयपीएलमध्ये हैदराबादसाठी शानदार फलंदाजी करून सर्वांची मने जिंकली होती.
त्यानंतर राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा रियान पराग चौथ्या क्रमांकावर येऊ शकतो. २०२४ ची आयपीएल परागसाठी चांगली होती. तो या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू होता. परागने ५७३ धावा केल्या होत्या. पुढे यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्मा पाचव्या क्रमांकावर दिसू शकतो.
यानंतर रिंकू सिंग सहाव्या क्रमांकावर येऊ शकतो, जो फिनिशरची भूमिका निभावतो, तर अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर सातव्या क्रमांकावर येऊ शकतो. सुंदर आणि रिंकूच्या क्रमात बदल होऊ शकतो.
संघ तीन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतो. वेगवान गोलंदाजांच्या यादीत आवेश खान, डावखुरा खलील अहम आणि केकेआरकडून खेळणारा हर्षित राणा यांचा समावेश असू शकतो. वेगवान गोलंदाजांच्या या त्रिकुटासह, रवी बिश्नोईला मुख्य फिरकी गोलंदाज म्हणून ठेवता येईल, त्याला वॉशिंग्टन सुंदरची साथ मिळेल.
शुभमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रियान पराग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, आवेश खान, खलील अहमद, हर्षित राणा, रवी बिश्नोई.
संबंधित बातम्या