IND Vs SL Asia Cup : आशिया कपच्या फायनलमध्ये श्रीलंका ५० धावांत गारद, सिराजचे ६ विकेट
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND Vs SL Asia Cup : आशिया कपच्या फायनलमध्ये श्रीलंका ५० धावांत गारद, सिराजचे ६ विकेट

IND Vs SL Asia Cup : आशिया कपच्या फायनलमध्ये श्रीलंका ५० धावांत गारद, सिराजचे ६ विकेट

Sep 17, 2023 05:28 PM IST

india vs sri lanka asia cup 2023 final scorecard : भारत आणि श्रीलंका यांच्यात आशिया कप २०२३ ची फायनल सुरू आहे. या सामन्यात श्रीलंकेचा संघ प्रथम फलंदाजी करताना अवघ्या ५० धावांत गारद झाला.

india vs sri lanka scorecard
india vs sri lanka scorecard (AFP)

india vs sri lanka asia cup 2023 final : आशिया चषकाच्या फायनलमध्ये श्रीलंकेचा संपूर्ण संघ ५० धावांवर गारद झाला आहे. भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. याआधी, या वर्षी जानेवारीमध्ये भारताने श्रीलंकेला २२ षटकांत ७३ धावांत गुंडाळले होते.

इतकंच नाही तर भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यात कोणत्याही संघाची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी बांगलादेशने २०१४ मध्ये मीरपूरमध्ये भारताविरुद्ध ५८ धावा केल्या होत्या. 

५० धावा ही कोणत्याही वनडे स्पर्धेच्या फायनलमधील सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी २००० मध्ये शारजाह येथे भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध ५४ धावांत ऑलआऊट झाला होता. आता श्रीलंकेने सर्वात कमी धावसंख्याही केली आहे. 

सिराजचे २१ धावात ६ विकेट्स

तत्पूर्वी, श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पथुम निसांका आणि कुसल परेरा यांनी श्रीलंकेच्या संघाकडून सलामीला आले. तर पहिले षटक वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने टाकले. पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर बुमराहने कुसल परेराला आपला बळी बनवले.

यानंतर श्रीलंकेने सामन्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आणि ३ षटकांत १ गडी बाद ८ धावा केल्या. पण इथून पुढच्या म्हणजेच डावाच्या चौथ्या षटकात आलेल्या सिराजने सगळी कथाच बदलून टाकली. त्याने या षटकातील ६ चेंडूत ४ धावा देत ४ मोठे बळी घेतले आणि श्रीलंकेच्या संघाचा फडशा पाडला.

यानंतर श्रीलंकेला केवळ १५.२ षटकेच खेळता आली. मथिशा पाथिराना हा बाद होणारा शेवटचा फलंदाज होता. पाथीरानाला हार्दिक पांड्याने इशान किशनच्या हाती झेलबाद केले. भारतीय संघाकडून मोहम्मद सिराजने ७ षटकात २१ धावा देत ६ बळी घेतले. यादरम्यान त्याने एक ओव्हर मेडनही टाकली. याशिवाय हार्दिक पांड्याने ३ तर जसप्रीत बुमराहने एका खेळाडूला बाद केले.

५ फलंदाज शुन्यावर बाद

श्रीलंकेकडून कुसल मेंडीसने सर्वाधिक १७ धावा केल्या. त्याने ३४ चेंडूचा सामना करताना ३ चौकार मारले. यानंतर ९व्या क्रमांकावर आलेल्या दुशना हेमंताने १३ धावा केल्या. त्याने १५ चेंडूत एक चौकार मारला. या दोघांशिवाय श्रीलंकेचा एकही फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकला नाही. श्रीलंकेचे ५ फलंदाज शुन्यावर बाद झाले. तर ४ फलंदाज एकेरी धावंख्येवर बाद झाले.

Whats_app_banner