virat kohli hugged rohit sharma : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या भलताच फॉर्मात आहे. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा ओलांडणाऱ्या रोहितनं आशिया चषकातील 'सुपर फोर' सामन्यात लौकिकाला साजेसी फलंदाजी केली. उत्तम नेतृत्व करताना त्यानं अप्रतिम क्षेत्ररक्षणही केलं. स्लीपमध्ये त्यानं पकडलेला एक अफलातून झेल सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. रोहितनं हा झेल घेतल्यानंतर विराटनं दिलेली प्रतिक्रिया त्याहूनही जास्त व्हायरल झाली आहे.
भारत आणि श्रीलंका संघातील सामन्यात लंकेचा कर्णधार दासून शनाका १३ चेंडूत ९ धावा करून बाद झाला. २५ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर रोहित शर्मानं स्लिपमध्ये त्याचा झेल टिपला. रवींद्र जडेजा त्यावेळी गोलंदाजी करत होता. उजव्या बाजूला किंचित पुढं झेपावत रोहितनं हा झेल टिपला. अत्यंत अप्रतिम असा हा झेल होता. हा झेल पाहून विराट कोहली इतका खूष झाला की त्यानं रोहित शर्माला मिठीच मारली. विराटची ही कृती चाहत्यांच्याही आनंदाचं कारण ठरली आहे.
विराट कोहलीनं रोहितला मारलेल्या मिठीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा सामन्यातील सर्वोत्तम क्षण असल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे.
'सुपर फोर' फेरीसाठी काल झालेल्या सामन्यात श्रीलंकेनं भारताचा डाव २१२ धावांवर गुंडळाला. भारताचं हे माफक आव्हान देखील श्रीलंकेला पेलता आलं नाही. प्रत्युत्तरादाखल टीम इंडियानं श्रीलंकेचा डाव १७२ धावांत गुंडाळला. भारताकडून कुलदीप यादवनं चार गडी बाद केले. ड्युनिथ वेलालगेला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. त्यानं पाच गडी बाद केले आणि श्रीलंकेसाठी नाबाद ४२ धावा केल्या.