IND vs SL : भारत-श्रीलंका वनडे टाय, चरिथ असलंकाने दोन चेंडूत फिरवला सामना, जिंकलेली बाजी टीम इंडियाने गमावली-india vs sri lanka 1st odi match tied ind vs sl scorecard highlights todays 1st odi match ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs SL : भारत-श्रीलंका वनडे टाय, चरिथ असलंकाने दोन चेंडूत फिरवला सामना, जिंकलेली बाजी टीम इंडियाने गमावली

IND vs SL : भारत-श्रीलंका वनडे टाय, चरिथ असलंकाने दोन चेंडूत फिरवला सामना, जिंकलेली बाजी टीम इंडियाने गमावली

Aug 02, 2024 10:27 PM IST

भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो येथे खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेतील पहिला सामना टाय झाला. या सामन्यात रोहित शर्माने अर्धशतक झळकावले.

IND vs SL highlights : भारत-श्रीलंका वनडे टाय, चरिथ असलंकाने दोन चेंडूत फिरवला सामना, जिंकलेली बाजी टीम इंडिया हरली
IND vs SL highlights : भारत-श्रीलंका वनडे टाय, चरिथ असलंकाने दोन चेंडूत फिरवला सामना, जिंकलेली बाजी टीम इंडिया हरली (AP)

भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो येथे खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला आहे. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने २३० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ ४७.५ षटकांत २३० धावांवर गारद झाला. 

भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे इतिहासातील हा दुसरा सामना बरोबरीत सुटला. हा सामना कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला गेला.

एकवेळ भारताला ३ षटकात केवळ १ धाव करायची होत्या आणि २ विकेट शिल्लक होत्या, पण कर्णधार चारिथ असलंकाने २ चेंडूत २ विकेट घेत सामना टाय करून दाखवला. 

असलंकाने ४८व्या षटकातील चौथ्या चेंडूवर शिवम दुबेला बाद केले. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने अर्शदीप सिंगलाही बाद केले. अर्शदीपने एलबीडब्ल्यूविरुद्ध रिव्ह्यू घेतला. पण तो वाचू शकला नाही. असलंका व्यतिरिक्त हसरंगाने ३ गडी बाद केले.

शुभमन गिलची संथ फलंदाजी

लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी १२.४ षटकात ७५ धावांची भागीदारी केली. या भागीदारीत गिलचे योगदान विशेष राहिले नाही आणि त्याने १६ धावा करण्यासाठी ३५ चेंडू घेतले. रोहित पूर्ण फॉर्ममध्ये होता आणि त्याने केवळ ३३ अर्धशतके पूर्ण केली.

फिरकीपटू ड्युनिथ वेलाल्गेने गिलला बाद करून ही भागीदारी मोडली. काही वेळाने वेललागेने रोहित शर्माला एलबीडब्ल्यू आऊट केले. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या वॉशिंग्टन सुंदरला (५) विशेष काही करता आले नाही आणि त्याला अकिला धनंजयने बाद केले.

यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्यात चौथ्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी झाली. दोन्ही खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होते आणि दोघेही चांगली खेळी खेळणार असल्याचे दिसत होते. पण वानिंदू हसरंगने विराट कोहलीला एलबीडब्ल्यू आऊट करून ही भागीदारी तोडली. कोहलीने ३२ चेंडूत २४ धावा केल्या, ज्यात २ चौकारांचा समावेश होता. कोहलीपाठोपाठ श्रेयस अय्यर (२३)ही पॅव्हेलियनमध्ये गेला, त्याला असिथा फर्नांडोने बोल्ड केले.

शिवम दुबेला सामना फिनीश करता आला नाही

श्रेयस बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या ५ गड्यांच्या मोबदल्यात १३२ धावा होती. येथून केएल राहुल आणि अक्षर पटेल यांनी हुशारीने फलंदाजी केली. अक्षर-राहुलने सहाव्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली. केएल राहुल ३१ धावा करून वानिंदू हसरंगाचा बळी ठरला. अक्षर पटेल (३३) याला श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंकाने बाद केले. येथून शिवम दुबेने भारताला विजयाच्या जवळ आणले, पण सामना संपवता आला नाही.

श्रीलंकेचा डाव

या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ८ गडी गमावून २३० धावा केल्या होत्या. श्रीलंकेची सुरुवात खराब झाली आणि तिसऱ्याच षटकात अविष्का फर्नांडोची विकेट गमावली. अवघी एक धाव घेतल्यानंतर फर्नांडो मोहम्मद सिराजच्या चेंडूवर अर्शदीपकडे झेलबाद झाला. १४व्या षटकात शिवम दुबेने यष्टिरक्षक फलंदाज कुसल मेंडिसची (१४) विकेट काढली.

कुसल मेंडिस बाद झाला तेव्हा श्रीलंकेची धावसंख्या ४६ धावा होती. श्रीलंकेला लवकरच तिसरा धक्का बसला. अवघ्या ८ धावा करून सदिरा समरविक्रमाला अक्षर पटेलच्या चेंडूवर शुभमन गिलने झेलबाद केले. श्रीलंकेच्या संघाला कर्णधार चारिथ असलंकाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, पण त्याने निराशा केली.

वैयक्तिक १४ धावांवर असलंका चायनामन गोलंदाज कुलदीप यादवचा बळी ठरली. असलंका बाद झाल्यानंतर काही वेळातच पथुम निसांकाने आपले अर्धशतक केले. निसांका (५६) मोठी खेळी खेळणार आहे, असे वाटत होते, मात्र तो वॉशिंग्टन सुंदरचा चेंडू नीट समजू शकला नाही आणि त्याला एलबीडब्ल्यू आऊट व्हावे लागले. 

१०१ धावांत ५ गडी बाद झाल्यानंतर, ड्युनिथ वेलालागे आणि जेनिथ लियानागे यांनी श्रीलंकेची जबाबदारी सांभाळली आणि सहाव्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी केली. लियानागे २० धावा करून अक्षर पटेलचा बळी ठरला. यानंतर अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर २४ धावांची तुफानी खेळी खेळणाऱ्या वानिंदू हसरंगाची विकेटही श्रीलंकेने गमावली.

वेलालगेने शानदार खेळी खेळली

हसरंगा बाद झाल्यानंतर दुनिथ वेलालगेने अकिला धनंजय (१७) सोबत आठव्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे श्रीलंकेचा संघ सन्मानजनक धावसंख्या गाठण्यात यशस्वी ठरला. वेलल्गेने ६५ चेंडूंत ७ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ६७ धावा केल्या.

तर पथुम निसांकाने ७५ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने ५६ धावा केल्या. भारताकडून अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.