भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ४ टी-20 सामन्यांच्या मालिकेतील २ सामने खेळले गेले आहेत. यातील एक सामना टीम इंडियाने ६१ धावांनी जिंकला, तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला ३ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला.
आता या मालिकेतील तिसरा सामना सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे होणार आहे. या मालिकेत आत्तापर्यंत दोन्ही सामन्यांमध्ये जर एखाद्या गोलंदाजाचा दबदबा दिसला असेल तर तो भारतीय संघाचा मिस्ट्री फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती आहे. पहिल्या सामन्यात त्याने ३ विकेट घेतल्या होत्या, तर दुसऱ्या सामन्यात त्याने ५ फलंदाज बाद केले.
आता वरुणला पुढील दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाचा महान फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याचा मोठा विक्रम मोडण्याची संधी आहे.
रविचंद्रन अश्विन आणि रवी बिश्नोई यांनी संयुक्तपणे भारतीय संघासाठी T20 द्विपक्षीय मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे, ज्यामध्ये अश्विनने २०१५-१५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळलेल्या T20 मालिकेत ९ विकेट घेतल्या होत्या. तर रवी बिश्नोई याने २०२३-२४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत ९ विकेट घेतल्या होत्या.
वरुण चक्रवर्तीबद्दल बोलायचे झाले तर त्याने आतापर्यंत या मालिकेतील २ सामन्यात ८ विकेट्स घेतल्या आहेत. ज्यामध्ये त्याने मालिकेतील उर्वरित २ सामन्यांमध्ये आणखी २ विकेट घेतल्यास तो या यादीत अव्वल स्थानी पोहोचून इतिहास रचेल.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ४ सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा सामना सेंच्युरियनमधील सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळला जाईल. या मैदानावर टीम इंडियाने २०१८ साली आपला शेवटचा सामना खेळला होता, ज्यामध्ये टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना १८८ धावा केल्या आणि यजमान आफ्रिकेने हे लक्ष्य १८.४ षटकात पूर्ण केले.