मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs SA Test : केपटाऊन कसोटी जिंकण्यासाठी भारताला ७९ धावांचे लक्ष्य, दुसऱ्या डावात बुमराहचे ६ विकेट

IND vs SA Test : केपटाऊन कसोटी जिंकण्यासाठी भारताला ७९ धावांचे लक्ष्य, दुसऱ्या डावात बुमराहचे ६ विकेट

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 04, 2024 03:31 PM IST

IND vs SA 2nd Test Day 2 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना केपटाऊन येथे खेळला जात आहे. या सामन्याचा आज (४ जानेवारी) दुसरा दिवस आहे.

india vs south africa
india vs south africa (PTI)

India Vs South Africa Test Day 2 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना बुधवारपासून (३ जानेवारी) केपटाऊनमध्ये खेळवला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच भारताला विजयासाठी ७९ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. भारताने केपटाऊनमध्ये कधीच कसोटी सामना जिंकला नाही, आता आज भारताला इतिहास रचण्याची संधी आहे.

दक्षिण आफ्रिकेने आज दुसऱ्या दिवशी ३ बाद ६२ धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली. दुसऱ्या डावात ते १७६ धावांत सर्वबाद झाले. पहिल्या डावात आफ्रिकेने ५५ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारत आपल्या पहिल्या डावात १५३ धावांवर ऑलआऊट झाला होता. अशा प्रकारे टीम इंडियाला विजयासाठी ७९ धावांचे लक्ष्य मिळाले आहे.

केपटाऊन कसोटीत आज (४ जानेवारी) दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दुसऱ्या डावात ३ बाद ६२ धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी पहिल्याच षटकात डेव्हिड बेडिंगहॅमला जसप्रीत बुमराहने यष्टिरक्षक केएल राहुलच्या हाती झेलबाद केले. बेडिंगहॅमला केवळ ११ धावा करता आल्या. 

त्यानंतर बुमराहने काइल वेरेनलाही स्वस्तात बाद केले. वेरेन बाद झाल्यानंतर आफ्रिकेची धावसंख्या ५ विकेट्सवर ८५ धावा झाली. 

आफ्रिकेचे फलंदाज एकामागोमाग तंबूत परतत राहिले पण दुसऱ्या टोकाने मार्करम आक्रमक फलंदाजी करत होता. एडन मार्करामने अवघ्या ९९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. मार्करामने १७ चौकार आणि २ षटकारांसह १०६ धावा केल्या. 

मार्करामला मोहम्मद सिराजने बाद केले. मार्कराम बाद झाल्यानंतर आफ्रिकेने उर्वरित दोन विकेट स्वस्तात गमावल्या.

भारताकडून जसप्रीत बुमराहने ६ विकेट घेतल्या. मुकेश कुमार यांना दोन विकेट मिळाले. प्रसीद कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव १७६ धावांवरच आटोपला. भारताकडे पहिल्या डावात ९८ धावांची आघाडी होती. अशा परिस्थितीत आता दक्षिण आफ्रिकेने भारताला विजयासाठी ७९ धावांचे लक्ष्य दिले.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi