आयसीसी महिला टी-20 विश्वचषक २०२४ मध्ये भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांना पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून ५८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. आता भारतीय संघ आज (६ ऑक्टोबर) अ गटातील आपल्या दुसऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला भिडणार आहे.
हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरू होईल.
विशेष म्हणजे, भारतीय महिला संघाचा पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. दोन्ही संघांमध्ये खेळण्यात आलेल्या १५ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने भारताने १२ जिंकले आहेत.
या दोन्ही संघातील यापूर्वी शेवटचा सामना २०२४ च्या महिला आशिया कपमध्ये झाला होता, ज्यामध्ये भारतीय संघाने ७ विकेट्स राखून विजय मिळवला होता.
महिला टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सात सामने खेळले गेले आहेत. यात भारताने ५ सामने तर पाकिस्तानने २ सामने जिंकले आहेत. २०१२ आणि २०१६ च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने हे दोन विजय मिळवले होते.
तथापि, उत्कृष्ट रेकॉर्ड असूनही, भारत आपल्या प्रतिस्पर्ध्याला हलके घेण्याची चूक करू शकत नाही. पाकिस्तानकडे अनुभवी निदा दार, कर्णधार फातिमा सना आणि सादिया इक्बालसारखे चांगले गोलंदाज आहेत.
तसेच, सध्याच्या स्पर्धेत भारतीय संघाची सुरुवात पराभवाने झाली आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानने दमदार सुरुवात करत पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा ३१ धावांनी पराभव केला होता. त्या सामन्यात पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना हिने अष्टपैलू कामगिरी केली होती. फातिमाने अवघ्या १० धावांत २ बळी घेतले आणि फलंदाजीत ३० धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.
तर न्यूझीलंडकडून झालेल्या दारुण पराभवामुळे दुखावलेल्या भारतीय संघाला आपली मोहीम पुन्हा रुळावर आणायची असेल, तर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात संघाच्या कमतरतेवर मात करावी लागेल. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताने अरुंधती रेड्डीच्या रूपाने अतिरिक्त वेगवान गोलंदाजाचा समावेश केला होता, त्यामुळे फलंदाजीच्या क्रमात बदल करावे लागले.
भारताचा नेट रनरेट चांगला नाही आणि आता त्यांना पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचे सामने कोणत्याही किंमतीत जिंकावे लागतील.
न्यूझीलंडविरुद्ध कर्णधार हरमनप्रीत कौरला तिसऱ्या क्रमांकावर, जेमिमाह रॉड्रिग्जला चौथ्या क्रमांकावर आणि ऋचा घोषला पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागली. तर सहसा ती या ठिकाणी फलंदाजी करत नाही.
खेळपट्टीत ओलावा नसल्याने तीन वेगवान गोलंदाजांसह खेळण्याचा भारताचा निर्णय योग्य ठरला नाही आणि न्यूझीलंडच्या फलंदाजांनी त्यांचा सहज सामना केला.
त्यामुळे भारताला आपल्या वेगवान गोलंदाजांचा पुरेपूर वापर करता आला नाही, याचे उदाहरण म्हणजे पूजा वस्त्राकरने केवळ एकच षटक टाकले. तीन वेगवान गोलंदाजांसह खेळताना भारताला डावखुरा फिरकी गोलंदाज राधा यादवला वगळावे लागले आणि सामन्यादरम्यान तिची उणीव जाणवली. भारतीय संघ आता आपली फलंदाजी मजबूत करण्यासाठी दयालन हेमलताचा प्लेइंग-११ मध्ये समावेश करू शकतो.
संबंधित बातम्या