
Pakistan vs India Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये आज (२३ फेब्रुवारी) भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आहेत. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी ४९.४ षटकात सर्वबाद २४१ धावा केल्या. भारताला विजयासाठी २४२ धावा करायच्या आहेत.
टॉस जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली. बाबर आझमने काही चांगले फटके खेळले, पण २३ धावा करून तो बाद झाला. इमाम उल हकही केवळ १० धावा करून बाद झाला.
४७ धावांवर २ विकेट पडल्यानंतर मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांनी मिळून पाकिस्तानसाठी १०४ धावांची भर घातली. शकीलने ६२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
कर्णधार मोहम्मद रिझवानने ४६ धावा केल्या, मात्र इतक्या धावा करण्यासाठी त्याला ७७ चेंडू लागले. टी-20 क्रिकेटच्या या युगात रिजवानची ५९.७४ च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केल्याने पाकिस्तान संघाला मोठा फटका बसला. त्यामुळेच या सामन्यात भारतीय संघाला दमदार पुनरागमन करता आले. खुशदिल शाहने पुन्हा एकदा पाकिस्तान संघाची इज्जत वाचवण्याचे काम केले आणि ३८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
भारतीय संघासाठी कुलदीप यादवने मधल्या षटकांमध्ये वर्चस्व गाजवले. यादवने ९ षटकात ४० धावा देत ३ बळी घेतले. त्याने प्रथम फॉर्मात असलेल्या सलमान आगा याची विकेट घेतली, जो अवघ्या १९ धावा करून बाद झाला. यानंतर त्याने पुढच्याच चेंडूवर शाहीन आफ्रिदी यालाही गोल्डन डकवर बाद केले.
कुलदीपने नसीम शाह याच्या रुपात तिसरी विकेट घेतली. त्याने १४ धावा केल्या. यानंतर भारताकडून हार्दिक पांड्याने २ बळी घेतले. हर्षित राणा, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांनीही प्रत्येकी १ विकेट घेतली.
संबंधित बातम्या
