अंडर-१९ आशिया चषकात आज (३० नोव्हेंबर) भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आहेत. दोन्ही संघांमधील हा सामना दुबईत खेळला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात २८१ धावा केल्या. भारताला विजयासाठी २८२ धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
पाकिस्तानकडून शाहजेब खान याने १५९ धावांची शानदार खेळी केली. शाहजेबने १४७ चेंडूत ५ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने १५९ धावा केल्या. याशिवाय उस्मान खानने ६० धावा केल्या.
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने शानदार सुरुवात केली. भारतीय गोलंदाजांना पहिल्या विकेटसाठी ३१ षटकांपर्यंत वाट पाहावी लागली.
पाकिस्तान संघाला पहिला धक्का ३१व्या षटकात १६० धावांवर बसला. आयुष म्हात्रेने उस्मान खानला निखिल कुमारकरवी झेलबाद केले. त्याला ९४ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीने ६० धावा करता आल्या. यानंतर आयुषने ३३व्या षटकात हारून अर्शदला बाद केले. त्याला ३ धावा करता आल्या.
यानंतर समर्थने २ गडी बाद केले. त्याने ४४व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मोहम्मद रियाझुल्लाहला हरवंश सिंगकरवी झेलबाद केले. त्याला २७ धावा करता आल्या. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर फरहान युसूफला हरवंश सिंगने झेलबाद केले. फरहान खाते उघडू शकला नाही.
किरण चोरमलेने फहम उल हक (४) आणि युधजित गुहाने कर्णधार साद बेगला (४) बाद केले तर उमर झैब दोन धावा करून नाबाद राहिला आणि नवीन अहमद खानने ५ धावा केल्या. भारताकडून समर्थ नागराजने ३, तर आयुष म्हात्रेने २ गडी बाद केले. यद्धजीत आणि किरण यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील पहिला सामना आहे. दोघांना अ गटात ठेवण्यात आले आहे. या दोन संघांशिवाय या गटात यूएई आणि जपान आहेत. भारतीय संघ हा अंडर-19 आशिया कपच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. गेल्या १० पैकी ८ वेळा त्याने विजेतेपद पटकावले आहे. पाकिस्तानने एकदा भारतासोबत ट्रॉफी शेअर केली होती.
या स्पर्धेत सर्वांच्या नजरा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशीवर आहेत, जो नुकताच आयपीएल मेगा लिलावात १.१० कोटी रुपयांना राजस्थान रॉयल्समध्ये सामील झाला आहे.