IND W vs PAK W Highlights : टी-20 विश्वचषकात भारताचा पहिला विजय, रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND W vs PAK W Highlights : टी-20 विश्वचषकात भारताचा पहिला विजय, रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा

IND W vs PAK W Highlights : टी-20 विश्वचषकात भारताचा पहिला विजय, रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा

Oct 06, 2024 06:54 PM IST

India vs Pakistan Scorecard Womens T20 World Cup : महिला टी-20 वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि पाकिस्तान आमनेसामने होते. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा सहज धुव्वा उडवला.

Pakistan's Muneeba Ali (L) looks on as India's wicketkeeper Richa Ghosh breaks the stumps to dismiss her during the ICC Women's T20 World Cup cricket match between Pakistan and India at the Dubai International Cricket Stadium in Dubai on October 6, 2024. (Photo by Giuseppe CACACE / AFP)
Pakistan's Muneeba Ali (L) looks on as India's wicketkeeper Richa Ghosh breaks the stumps to dismiss her during the ICC Women's T20 World Cup cricket match between Pakistan and India at the Dubai International Cricket Stadium in Dubai on October 6, 2024. (Photo by Giuseppe CACACE / AFP) (AFP)

आयसीसी महिला टी-20 विश्वचषक २०२४ मध्ये आज अ गटातील महत्त्वाच्या लढतीत भारत आणि पाकिस्तान आमनेसामने होते. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारताने पाकिस्तानचा ६ विकेट्सनी सहज धुव्वा उडवला. 

या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद १०५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात १९व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर हे लक्ष्य पूर्ण केले. भारतीय संघाला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून ५८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

IND W vs PAK W Score Updates

भारताचे दोन चेंडूत दोन फलंदाज बाद

पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनाने सलग २ चेंडूत २ फलंदाजांना बाद करत पाकिस्तानच्या आशा उंचावल्या आहेत. फातिमा सनाने जेमिमाह रॉड्रिग्ज आणि रिचा घोष यांना बाद केले. आता भारताची धावसंख्या १६ षटकांनंतर ४ बाद ८४ धावा आहे. 

भारताकडून कर्णधार हरमनप्रीत कौर आणि अष्टपैलू दीप्ती शर्मा क्रीजवर आहेत. वहीम, भारतीय संघाला विजयासाठी २४ चेंडूत २२ धावांची गरज आहे.

शेफाली वर्मा बाद

६१ धावांवर ओमैमाने भारताला दुसरा धक्का दिला. तिने शेफाली वर्माला आलिया रियाझकरवी झेलबाद केले. ती ३२ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. कर्णधार हरमनप्रीत कौर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आली आहे. तिला साथ देण्यासाठी जेमिमाह रॉड्रिग्ज क्रीजवर हजर आहे. १२ षटकांनंतर संघाची धावसंख्या २ बाद ६२ धावा आहे.

भारताला पहिला धक्का

भारताला पहिला धक्का १८ धावांवर बसला. स्मृती मानधना १६ चेंडूत ७ धावा करून बाद झाली. तिला सादिया इक्बालने तुबा हसनच्या हातून झेलबाद केले. जेमिमाह रॉड्रिग्ज तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आली आहे. तिला साथ देण्यासाठी शेफाली वर्मा क्रीजवर हजर आहे.

पाकिस्तानच्या १०५ धावा

पाकिस्तानने भारताला विजयासाठी १०६ धावांचे लक्ष्य दिले आहे. पाकिस्तानकडून निदा दारने सर्वाधिक २८ धावा केल्या. भारताकडून वेगवान गोलंदाज अरुंधती रेड्डीने सर्वाधिक ३ बळी घेतले. तर श्रेयंका पाटीलने २ विकेट घेतल्या.

तत्पूर्वी, टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानची सुरुवात खराब झाली आणि पहिल्याच षटकात गुल फिरोझा (०) वेगवान गोलंदाज रेणुका सिंगच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाली. यानंतर सिद्रा अमीन (८ धावा)ही स्वस्तात बाद झाली. सिद्राला फिरकीपटू दीप्ती शर्माने बोल्ड केले. 

ओमाम्मा सोहेल (३) देखील फार काही करू शकला नाही आणि अरुंधती रेड्डीच्या चेंडूवर शेफाली वर्माकडे झेलबाद झाला.

ओमामा बाद झाली तेव्हा पाकिस्तानची धावसंख्या ३३/३ अशी होती. यानंतर सेट फलंदाज मुनिबा अली (१७ धावा) देखील पॅव्हेलियनमध्ये परतली, त्यामुळे पाकिस्तानची धावसंख्या ४ विकेटवर ४१ धावा झाली. श्रेयंका पाटीलने मुनिबाची विकेट घेतली.

पाकिस्तानला पाचवा झटका वेगवान गोलंदाज अरुंधती रेड्डी हिने दिला, ज्याने आलिया रियाझला (४ धावा) एलबीडब्ल्यू केले. या सामन्यात कर्णधार फातिमा सना (१३ धावा) फलंदाजीत चमत्कार करू शकली नाही आणि फिरकीपटू आशा शोभनाच्या चेंडूवर विकेटच्या मागे झेलबाद झाली. तुबा हसनला (०) ऑफस्पिनर श्रेयंका पाटीलने पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

येथून निदा दार आणि सय्यदा अरुब शाह यांनी आठव्या विकेटसाठी २८ धावांची भागीदारी केल्याने पाकिस्तान संघ १०० धावांचा टप्पा पार करू शकला.

पाकिस्तानला आठवा धक्का

अरुंधती रेड्डी यांनी पाकिस्तानला आठवा धक्का दिला. चांगल्या फॉर्ममध्ये दिसणाऱ्या निदा दारला तिने आपला बळी बनवले.

मुनिबा अली बाद

श्रेयंका पाटीलने पाकिस्तानला चौथा धक्का दिला. सलामीवीर मुनिबा अलीला यष्टिरक्षक रिचा घोषने यष्टिचित केले. तिला केवळ १७ धावा करता आल्या. आता पाकिस्तानला मोठ्या भागीदारीची गरज आहे. आलिया रियाझ सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आली आहे. १० षटकांनंतर संघाची धावसंख्या ४१/४ आहे.

पाकिस्तानला पहिला धक्का

पाकिस्तानला पहिला धक्का बसला आहे. रेणुका सिंग ठाकूरने गुल फिरोजाला बाद केले. गुल फिरोजा ४ चेंडूत शुन्यावर पॅव्हेलियनमध्ये परतली. पहिल्या षटकानंतर पाकिस्तानची धावसंख्या १ बाद १ धाव आहे.

पाकिस्तानची फलंदाजी सुरू

पाकिस्तानच्या डावाची सुरुवात झाली असून मनिबा अली आणि गुल फिरोझा डावाची सलामीसाठी आल्या आहेत. रेणुका सिंग भारतासाठी गोलंदाजी करत आहे.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

पाकिस्तान: मुनिबा अली (विकेटकीपर), गुल फिरोज, सिद्रा अमीन, निदा दार, आलिया रियाझ, ओमामा सोहेल, फातिमा सना (कर्णधार), तुबा हसन, नशरा संधू, सय्यदा अरुबा शाह, सादिया इक्बाल.

भारत: स्मृती मानधना, शेफाली वर्मा, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्ज, ऋचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, सजीवन सजना, श्रेयंका पाटील, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग.

पाकिस्तानची प्रथम फलंदाजी

पाकिस्तानी संघाची कर्णधार फातिमा सनाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेकीनंतर सांगितले की, आम्हीही प्रथम फलंदाजी केली असती, परंतु आम्हाला चांगली गोलंदाजी करून त्यांना रोखावे लागेल.

भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. पूजा वस्त्राकर दुखापतीमुळे बाहेर आहे. तिच्या जागी एस सजना प्लेइंग इलेव्हनमध्ये आली आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचा संघही एका बदलासह सामना खेळणार आहे. डायना बेग या सामन्यात खेळणार नाही.

भारत-पाकिस्तान हेड टू हेड रेकॉर्ड

भारत आणि पाकिस्तान टी-20 मध्ये आतापर्यंत एकूण १५ वेळा भिडले आहेत, ज्यामध्ये कट्टर प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध भारताचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे. भारताने पाकिस्तानला १३ वेळा पराभूत केले आहे, तर पाकिस्तान संघाला भारतीय संघाविरुद्ध तीन वेळा यश मिळाले आहे.

एकूण सामने- १५

भारतीय महिला संघ विजयी- १२

पाकिस्तान महिला संघ विजयी - ३

भारत-पाकिस्तान पीच रिपोर्ट

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही मदत करते. आतापर्यंत येथे एकूण ९९ टी-20 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ४६ सामने जिंकले आहेत आणि दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघाने ५२ सामने जिंकले आहेत. पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या १४१ धावा आणि दुसऱ्या डावात १२४ धावांची आहे.

भारताला विजय आवश्यक

आयसीसी महिला टी-20 विश्वचषक २०२४ मध्ये आज अ गटातील महत्त्वाच्या लढतीत भारतीय संघासमोर पाकिस्तानचे आव्हान असेल. भारताला पहिल्या गटात न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. किवी संघाने भारताचा ५८ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला होता.

दुसरीकडे पाकिस्तानने श्रीलंकेला हरवून स्पर्धेची सुरुवात केली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आहे. या मैदानावर भारताने पहिला सामनाही खेळला होता. या स्पर्धेत पाकिस्तान प्रथमच या मैदानात उतरणार आहे.

Whats_app_banner