India Vs Pakistan Match Tickets : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची तिकीट विक्री ३ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. तिकीट विक्रीची विंडो उघडताच काही मिनिटांतच सर्व तिकिटे विकली गेली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा चॅम्पियन्स ट्रॉफी सामना २३ फेब्रुवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
विशेष म्हणजे, चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा २०१७ नंतर प्रथम होत आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान भुषवत आहे. तर भारत आपले सर्व सामने दुबईत खेळणार आहे. दुबई आंतरराष्ट्री स्टेडियममध्ये २५००० प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या सामन्याच्या तिकिटांची विक्री सोमवारी संध्याकाळी ५.३० वाजता सुरू झाली होती. दुबई होणाऱ्या सामन्यांच्या तिकिटांची सर्वात कमी किंमत १२५ दिरहम म्हणजेच भारतीय चलनात जवळपास ३ हजार रुपये होती.
तर प्रीमियम लाउंजची किंमत ५००० दिरहम होती जी भारतीय चलनात १ लाख १८ हजार रुपये इतकी होती. भारत आणि पाकिस्तान सामन्याची तिकिटं न मिळाल्याने अनेक चाहत्यांची निराशा झाली.
पाकिस्तान क्रिकेट संघ या स्पर्धेचा गतविजेता आहे. २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानने अंतिम फेरीत भारताचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. अशा परिस्थितीत आता टीम इंडियाला आपला बदला घेण्याची संधी आहे. या स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी होत असून त्यांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. अ गटात भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंड या संघांचा समावेश आहे.
तर ब गटात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि अफगाणिस्तानचे संघ आहेत. गटातील सर्व संघ प्रत्येकी ३ साखळी सामने खेळतील आणि अव्वल ४ संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. यावेळी सेमीफायनल आणि फायनलमध्येही मोठा ट्विस्ट आहे.
जर भारतीय संघ उपांत्य फेरीत किंवा अंतिम फेरीत पोहोचला तर या सामन्याचे ठिकाण बदलेल म्हणजेच हे सामने यजमान पाकिस्तानमध्ये खेळवले जाणार नाहीत. भारतीय संघ बाद फेरीत पोहोचला तर हा सामना दुबईत होणार आहे.
संबंधित बातम्या