ICC Champions Trophy 2025 Dubai Match Tickets : चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान भुषवत आहे. भारतीय संघ आपले सामने दुबईत खेळणार आहे. अशा स्थितीत आता दुबईत होणाऱ्या सामन्यांच्या तिकिटांची विक्री ही आजपासून (३ फेब्रुवारी) सुरू होत आहे.
ही तिकिटे आजपासून भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५.३० वाजेपासून विक्रीसाठी उपलब्ध असतील. सौदी अरेबियाच्या चलनात सर्वात स्वस्त तिकीट १२५ दिरहम इतके असेल. तर भारतीय चलनात हे सुमारे ३ हजार रुपये इतके आहे. तुम्ही आयसीसीच्या अधिकृत वेबसाइट https://www.iccchampionstrophy.com/tickets वर जाऊन ऑनलाइन तिकिटे बुक करू शकता.
पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सामन्यांच्या तिकिटांची विक्री मंगळवारपासूनच सुरू झाली होती. ज्या चाहत्यांना ऑफलाइन तिकिटे खरेदी करायची आहेत ते ३ फेब्रुवारीपासून पाकिस्तानी वेळेनुसार संध्याकाळी ४ वाजल्यापासून ते करू शकतात. ही तिकिटे जगभरातील २६ शहरांमधील TCS केंद्रांवर उपलब्ध असतील.
पहिला उपांत्य फेरीचा सामनाही दुबईत होणार आहे. ICC ने एक अपडेट दिले आहे की अंतिम सामन्याच्या तिकिटाची किंमत पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर सांगितले जाईल.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये जगातील ८ सर्वोत्तम संघ सहभागी होणार आहेत. १९ दिवस चालणाऱ्या या ICC स्पर्धेत एकूण १५ सामने होणार आहेत. सर्व ८ संघांची प्रत्येकी ४ संघांच्या २ गटात विभागणी करण्यात आली आहे. अ गटात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश हे संघ आहेत. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानला ब गटात ठेवण्यात आले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात १९ फेब्रुवारीपासून होणार आहे. पाकिस्तानमध्ये होणारे सामने कराची, लाहोर आणि रावळपिंडी येथे खेळवले जातील. भारतीय संघाचे सामने दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत.
संबंधित बातम्या