भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना बंगळुरूत खेळला जात आहे. सामन्याचा पहिला दिवस (१६ ऑक्टोबर) पावसामुळे वाहून गेला. यानंतर आज दुसऱ्या दिवशी (१७ ऑक्टोबर) टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
पण ढगाळ वातावरण आणि खेळपट्टीवर ओलावा असूनही रोहित शर्माने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यानंतर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सीम आणि स्विंगच्या बळावर आपली दहशत निर्माण केली आणि भारताच्या टॉप ऑर्डरला अवघ्या १० धावांत गारद केले.
पहिल्या १० षटकांतच भारताने १० धावांत रोहित शर्मा, विराट कोहली आणि सरफराज खान यांच्या विकेट्स गमावल्या.
एम चिन्नास्वामी स्टेडियमच्या खेळपट्टीवर ढगाळ वातावरणात न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांनी फुल लेंथ चेंडू टाकून भारतीय फलंदाजांची खरी 'कसोटी' सुरू ठेवली.
सातव्या षटकात १६ चेंडूत केवळ २ धावा करून रोहित शर्मा क्लीन बोल्ड झाला तेव्हा डाव सांभाळण्याची जबाबदारी विराट कोहलीच्या खांद्यावर होती, पण किंग विराट कोहली ९ चेंडूत शुन्यावर बाद झाला. विराटने नवव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आपली विकेट गमावली , तो झेलबाद झाला.
यानंतर पुढच्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर सरफराज खानही शुन्यावर बाद झाला. अशाप्रकारे न्यूझीलंडने भारताच्या दोन फलंदाजांना पाच चेंडूंत शुन्यावर तंबूत पाठवले.
विराट कोहली जेवढा वेळ क्रीजवर होता, तेवढा वेळ तो अस्वस्थ दिसत होता. न्यूझीलंडच्या सिनियर गोलंदाजांनी भारतावर दबाव निर्माण केला होता. याचा फायदा नवा गोलंदाज विल्यम ओ'रुर्कने घेतला. भारतात पहिले षटक टाकताना त्याने विराट कोहलीसारख्या मोठ्या फलंदाजाला पायचीत केले.
ओ'रुर्कने शॉर्ट लेन्थ बॉलने कोहलीला चकित केले. बॉडी लाइनवरील बॉल विराटने सोडण्याचा प्रयत्न केला पण, चेंडू त्याच्या बॅटला लागून लेग स्लीपच्या दिशेने गेला आणि तिथे ग्लेन फिलिप्सने पुढे डायव्हिंग मारत शानदार कॅच घेतला.
सातत्याने चांगली गोलंदाजी करणाऱ्या मॅट हेन्रीला अखेर त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले. त्याने भारतीय डावाच्या १०व्या षटकात सरफराज खानला बाद करून भारताला अडचणीत आणले. सर्फराज खानला प्रतिआक्रमण करायचे होते. मोठा फटका मारून दडपण कमी करण्याच्या प्रयत्नात त्याने मोठा फटका मारला. पण तो थेट डेव्हॉन कॉनवेच्या हातात गेला.
मिडऑफवर डेव्हन कॉनवेने डायव्हिंग करत अप्रतिम झेल घेतला. मुंबईच्या या फलंदाजाची खेळी खाते न उघडता तीन चेंडूंत संपली. तत्पूर्वी, अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊदीने सातव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर केवळ रोहित शर्माला क्लीन बोल्ड केले. रोहित शर्माने १६ चेंडूत २ धावा केल्या.
संबंधित बातम्या