क्रिकेट विश्वचषक २०२३ चा पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आहे. या सामन्यात रोहित शर्मा भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे, तर किवी संघाची जबाबदारी केन विल्यमसनच्या खांद्यावर आहे.
पण उपांत्य फेरीच्या या सामन्यापूर्वीच मोठा वाद निर्माण झाला आहे. सामन्यापूर्वी वानखेडेची पीच बदलण्यात आल्याचा आरोप BCCI वर केला जात आहे. परदेशी मीडियाने हे आरोप केले आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (ICC) परवानगी न घेता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी बदलल्याचा दावा केला जात आहे. ब्रिटीश वेबसाइट डेली मेलने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार उपांत्य फेरी आता अशा खेळपट्टीवर होणार आहे जी आधीच दोनदा वापरली गेली आहे, त्यामुळे फिरकीपटूंना मदत मिळू शकते.
डेली मेलच्या वृत्तानुसार, ICC चे खेळपट्टी सल्लागार अँडी ऍटकिन्सन यांनी भारत-न्यूझीलंड सामन्यासाठी अशी खेळपट्टी निवडली होती, जी आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये वापरली गेली नव्हती. पण आता सामन्यापूर्वी अशी खेळपट्टी निवडण्यात आली आहे, ज्यावर आधीच विश्वचषकाचे दोन सामने खेळले गेले आहेत. असे करण्यामागचे कारण भारतीय फिरकीपटूंचा अधिक फायदा व्हावा, हे सांगितले जात आहे.
भारत-न्यूझीलंड उपांत्य सामन्यासाठी आधी ७ नंबरची पीच निवडण्यात आली होती. ही नवीन पीच होती, यावर एकही सामना झालेला नव्हता. पण BCCI आणि ICC अधिकार्यांच्या व्हॉट्सअॅप मेसेजमधून असे दिसून आले की उपांत्य सामना खेळपट्टी क्रमांक ६ वर हलवण्यात आला आहे, ज्यामध्ये इंग्लंड-दक्षिण आफ्रिका तसेच भारत-श्रीलंका यांच्यातील सामने खेळले गेले होते.