IND vs NZ Head To Head Record : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भारत आणि न्यूझीलंडचे संघ आमनेसामने येणार आहेत. भारतीय संघाने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. त्याचवेळी न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले. आता रविवारी (९ मार्च) भारत आणि न्यूझीलंडचे संघ अंतिम फेरीत भिडतील.
पण या जेतेपदाच्या सामन्यापूर्वी आपण येथे एक खास आकडेवारी जाणून घेणार आहोत. खरं तर, भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील वनडे फॉरमॅटमधील हेड टू हेड रेकॉर्ड काय आहे? हे आपण येथे पाहणार आहोत.
वनडे फॉरमॅटमध्ये आतापर्यंत भारत आणि न्यूझीलंड ११९ वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये भारतीय संघाने ६१ वेळा न्यूझीलंडचा पराभव केला आहे. तर न्यूझीलंडने टीम इंडियाचा ५० वेळा पराभव केला आहे. याशिवाय दोन्ही संघांमधील ७ सामने निकालाशिवाय संपले आहेत.
अलीकडेच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप स्टेज मॅचमध्ये भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा ४४ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर भारत आणि न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोनदा आमनेसामने आले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी २००० च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता. या स्पर्धेतील दोन्ही संघांचे हेड टू हेड रेकॉर्ड बरोबरीचे आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने बांगलादेशला हरवून आपल्या मोहिमेची सुरुवात केली. यानंतर ग्रुप स्टेज मॅचमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा पराभव झाला.
त्याचवेळी भारतीय संघाने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. आतापर्यंत भारतीय संघाने स्पर्धेतील सर्व सामने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडने बांगलादेश व्यतिरिक्त पाकिस्तानचा पराभव केला आहे. याशिवाय उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाला होता. आतापर्यंत या स्पर्धेत न्यूझीलंडला केवळ भारताविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे.
संबंधित बातम्या