मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आजपासून (१ नोव्हेंबर) खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी एकूण १४ विकेट पडल्या. प्रथम न्यूझीलंडचा संघ २३५ धावांवर सर्वबाद झाला. किवी संघाकडून डॅरिल मिशेलने ८२ आणि विल यंगने ७१ धावा केल्या. भारताकडून रवींद्र जडेजाने ५ आणि वॉशिंग्टन सुंदरने ४ विकेट घेतल्या.
प्रत्युत्तरात टीम इंडियाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत ४ विकेट गमावून ८६ धावा केल्या होत्या. रोहित शर्मा १८ धावा करून बाद झाला तर विराट कोहली ४ धावा करून धावबाद झाला. न्यूझीलंडकडून एजाज पटेलने दोन बळी घेतले.
तत्पूर्वी भारताची सुरुवात चांगली झाल्यासारखे वाटत होते, कारण रोहित शर्माने तीन चौकार मारले, पण तो जास्त वेळ क्रीजवर टिकू शकला नाही. रोहित १८ चेंडूत १८ धावा करून बाद झाला. एकेकाळी भारताची धावसंख्या एका विकेटवर ७८ धावा होती, पण त्यानंतर लागोपाठ ३ विकेट पडल्या.
यशस्वी जैस्वाल ३०, नाईट वॉचमन मोहम्मद सिराज शुन्य आणि विराट कोहली ४ धावा करून बाद झाले. कोहली धावबाद झाला. दिवसअखेर शुभमन गिल ३१ धावांवर नाबाद तर ऋषभ पंत १ धावांवर नाबाद माघारी परतला. न्यूझीलंडकडून आतापर्यंत एजाज पटेलने दोन आणि विल्यम ओरूकने १ विकेट घेतली आहे.
नाणेफेक जिंकल्यानंतर न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आकाशदीपने किवी संघाला पहिला धक्का दिला. त्याने डेव्हन कॉनवेला एलबीडब्ल्यू आऊट केले. कॉनवेला केवळ ४ धावा करता आल्या. यानंतर टॉम लॅथम आणि विल यंग यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी झाली. वॉशिंग्टन सुंदरने एकूण ५९ धावांवर न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. सुंदरने लॅथमला बोल्ड केले. तो २८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
यानंतर रचिन रवींद्रही जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही. रचिन ५ धावा करून बाद झाला. रचिनलाही सुंदरने बोल्ड केले. ७२ धावांवर ३ विकेट पडल्यानंतर डॅरिल मिशेल आणि विल यंग यांच्यात ८७ धावांची भागीदारी झाली. विल यंग ७१ धावा करून बाद झाला. त्यानंतर किवी संघाने सातत्याने विकेट गमावल्या.
ग्लेन फिलिप्स १७, डॅरिल मिशेल ८२, ईश सोधी ७, मॅट हेन्री शुन्य आणि एजाज पटेल ७ धावा करून बाद झाले. अशाप्रकारे न्यूझीलंडचा संपूर्ण संघ २३५ धावांत गडगडला. रवींद्र जडेजाने भारतासाठी आपला पंजा उघडला. वॉशिंग्टन सुंदरने 4 बळी घेतले.