भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरू आहे. सामन्याचा आज (२६ ऑक्टोबर) तिसरा दिवस आहे. न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या डावात े२५५ धावांत सर्वबाद झाला असून भारताला विजयासाठी ३५९ धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
याआधी भारतीय संघाचा पहिला डाव १५६ धावांवर संपला. मिचेल सँटनरने एकट्याने ७ बळी घेतले. पहिल्या डावाच्या जोरावर किवीजला १०३ धावांची आघाडी मिळाली. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने पहिल्या डावात २५९ धावा केल्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने ७ विकेट घेतल्या.
न्यूझीलंडचा दुसरा डाव २५५ धावांवर संपला. न्यूझीलंड संघाकडून दुसऱ्या डावात टॉम लॅथमने सर्वाधिक ८६ धावा केल्या. दुसऱ्या डावात भारतासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदर होता, त्याने ४ बळी घेतले. रवींद्र जडेजाने ३ तर अश्विनला २ बळी मिळाले.
न्यूझीलंडने दुसऱ्या डावाची सुरुवात सावधपणे केली. न्यूझीलंडची पहिली विकेट ३६ धावांवर डेव्हन कॉनवे (१७) च्या रूपाने पडली. तो वॉशिंग्टन सुंदरचा बळी ठरला. न्यूझीलंड संघाला ७८ धावांवर दुसरा धक्का बसला, जेव्हा अश्विनने विल यंगला (२३) फिरकीत पायचीत केले.
त्यानंतर सुंदरने रचिन रवींद्रला (९) बोल्ड केले. रवींद्र बाद झाला तेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या ८९/३ अशी होती. यानंतर सुंदरने डॅरिल मिशेल (१८) यालाही बाद केले. मिचेल एरियल शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना यशस्वी जैस्वालच्या हाती झेलबाद झाला.
येथून कर्णधार टॉम लॅथम आणि यष्टिरक्षक फलंदाज टॉम ब्लंडेल यांनी मिळून पाचव्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली. टॉम लॅथमला एलबीडब्ल्यू आऊट करून सुंदरने ही भागीदारी संपवली. १३३ धावांचा सामना करताना लॅथमने १० चौकारांसह ८६ धावा केल्या. येथून दुसऱ्या दिवसअखेर टॉम ब्लंडेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी किवीजचे आणखी नुकसान होऊ दिले नाही.
यानंतर आज तिसऱ्या दिवशी (२६ ऑक्टोबर) न्यूझीलंडने ५ बाद १९८ धावांवरून डावाला सुरुवात केली. पण जडेजाने टॉम ब्लंडेलला (४१) क्लीन बोल्ड केले. त्यावेळी किवी संघाची धावसंख्या २३१/६ होती. काही वेळाने जडेजाच्या चेंडूवर लाँग शॉट मारण्याच्या प्रयत्नात मिचेल सँटनर (४) लाँग ऑनवर जसप्रीत बुमराहच्या हाती झेलबाद झाला.
यानंतर टीम साऊदी आणि एजाज पटेल हेही थोड्या अंतराने अश्विन आणि जडेजाचे बळी ठरले. न्यूझीलंड संघाची शेवटची विकेट विल्यम ओरूर्कची होती, तो धावबाद झाला. ग्लेन फिलिप्स (४८) नाबाद परतला.
संबंधित बातम्या